Fri, Aug 23, 2019 14:30होमपेज › Konkan › वांद्री येथील अवैध दारुधंदा ग्रामस्थांकडून उद्ध्वस्त

वांद्री येथील अवैध दारुधंदा ग्रामस्थांकडून उद्ध्वस्त

Published On: Jun 12 2018 12:52AM | Last Updated: Jun 11 2018 11:02PMरत्नागिरी : प्रतिनिधी

संगमेश्‍वर तालुक्यातील वांद्री येथे कानलकोंड, मानसकोंड व वांद्री गावांमधील सुमारे 400 महिला -पुरुषांनी आक्रमक पवित्रा घेत वांद्री बाजारपेठेत रविवारी रात्री 9.30 वा.च्या सुमारास दारुअड्ड्यावर धडक देत हंगामा केला. गेले अनेक दिवस बेकायदेशीर गावठी दारुअड्डा बंद करण्याची मागणी या गावांतील महिलांकडून होत होती. मात्र, दारुअड्डा बंद होत नव्हता. अखेर महिलांनी आक्रमक पवित्रा घेत गावठी दारु अड्डा उद्ध्वस्त केला. तिन्ही गावांच्या विकासासाठी हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगण्यात आले. 

वांद्री कुणबीवाडी येथील विठ्ठल मंदिरात रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या तिन्ही गावांतील ग्रामस्थांमध्ये बैठक झाली. जवळपास तीन तास या बैठकीत दारुधंद्याविषयी चर्चा करण्यात आली. शेवटी महिलांनी आक्रमक होत दारु बंदी झालीच पाहिजे, असा पवित्रा घेतला. यावेळी बोलताना नवी मुंबईचे माजी नगरसेवक, यादव चॅरिटी ट्रस्टचे माजी राज्याध्यक्ष, दानशूर व्यक्‍तिमत्व, कानलकोंडचे उद्योजक शंकर माटे यांनी वांद्री येथे दारुबंदी झालीच पाहिजे, असा आग्रह धरला.

याबाबत जवळपास तीन तासांच्या चर्चेनंतर रिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहनातून जमावाने रात्री 9.30 च्या सुमारास वांद्री बाजारपेठेतील मंगेश मयेकर यांच्या घरावर चाल करुन घेराव घातला. यावेळी मयेकर यांना सामंजस्याने समजावत दारुविक्री आतापासून बंद झालीच पाहिजे, असे सांगितले. मात्र, मयेकर यांनी आम्ही दोन दिवसांत आमचा निर्णय कळवतो, असे सांगितल्यानंतर अधिक आक्रमक होत आम्ही तुमचा निर्णय ऐकण्यासाठी आलेलो नाही, असे ठणकावून सांगितले. यानंतर हा जमाव मकरंद गांधी यांच्या घरावर चाल करुन गेला. मकरंद गांधी घरी नसल्यामुळे घरातील महिलांना सांगून दारु बंद करण्याच्या सूचनाही दिल्या.

यावेळी मानसकोंड येथील पोलिस पाटील सुनील शिगवण, विकास फेपडे, गणपत फेपडे, सुहास मायंगडे, गणुजी फेपडे, शिक्षक नथुराम पाचकले व महिला तसेच कानलकोंड येथील जनार्दन सुर्वे, कृष्णा कानर, ममता कानर यांच्यासह सुमारे 400 ग्रामस्थ या मोर्चात सहभागी झाले होते.