Wed, Jul 17, 2019 18:18होमपेज › Konkan › किनारी गावांत आपत्ती निवारण प्रशिक्षण

किनारी गावांत आपत्ती निवारण प्रशिक्षण

Published On: Apr 21 2018 1:00AM | Last Updated: Apr 20 2018 11:25PMरत्नागिरी : प्रतिनिधी

पावसाळ्यात आणि वादळी स्थितीत होणार्‍या नैसर्गिक आपत्तीमध्ये किनारी गावांत सतर्कता रहावी,  यासाठी जिल्ह्यातील 72 किनारी गावांत आपत्ती निवारण प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  तातडीची उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्तरावर आपत्ती निवारण पथके सज्ज करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या सागरी  किनारा सुरक्षा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जिल्ह्यात  सागरी किनारी भागात सुमारे पाऊणशे गावे समाविष्ट आहेत.  दहा वर्षांपूर्वी आलेल्या त्सुनामी  संकटात किनारी गावांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले होते.  त्यानंतर शासनाने ‘सागरी किनारा सुरक्षा’ कार्यक्रम सुरू केला होता. यामध्ये केवळ प्रशासकीय स्तरावर आपत्ती निवारण कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र, आता ग्रामीण पर्यटन योजनेत ‘सागरी सुरक्षा कार्यक्रम’  किनारी गावांसाठीही राबविण्यात येणार आहे.  यामध्ये रत्नागिरी, राजापूर, दापोली आणि गुहागर या सागरी तालुक्यांतील गावांचा समावेश करण्यात आला आहे. 

रत्नागिरी तालुक्यातील 20 किनारी गावांचा, राजापूरमधील 18, गुहागर तालुक्यातील 15 आणि राजापूर तालुक्यातील 19 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांना वादळी वार्‍याने होणार्‍या आपत्तीत, हायटाईडमध्ये उद्भवणार्‍या परिस्थितीत करण्यात येणार्‍या  निवारण योजना, नौकानयन, जलतरण, त्यासाठी कराव्या लागणार्‍या उपाय योजना,  किनार्‍यालगत असलेल्या धोकादायक ठिकाणावर कराव्या लागणार्‍या  उपाययोजनांचा प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये समावेश आहे. रत्नागिरी तालुक्यात भाट्ये, कुर्ली, पावस, गावखडी, आरे-वारे, काळबादेवी,  नेवरे, मालगुंड, वरवडे,  साखरतर, कासारवेली, ओरी आदी गावांचा समावेश करण्यात आला आहे. 

ग्रामीण पर्यटनमधून निधी

किनारी गावांना ग्रामीण पर्यटन विकास योजनेतून निधीची तरतूद करण्यात आली आहे.  गावांना सुरक्षितता पुरविणार्‍या विविध साधनांचा पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये  आपत्तीमध्ये बचावकार्य करण्यासाठी लागणारी सागरी साधने, बोट, लाईफ जॅकेट,   सुरक्षा दोर  यासह अत्याधुनिक संपर्क यंत्रणा पुरविण्यात येणार आहेत. 

Tags : kokan news, Disaster prevention training in coastal villages