होमपेज › Konkan › दिंड्यांची पारंपरिक वाट ‘जयगड पोर्ट’ने केली बंद

दिंड्यांची पारंपरिक वाट ‘जयगड पोर्ट’ने केली बंद

Published On: Aug 14 2018 1:07AM | Last Updated: Aug 13 2018 11:04PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

तालुक्यातील नांदिवडे ग्रामस्थांनी पहिलाच श्रावणी सोमवार वेगळ्याच पद्धतीने साजरा केला.  जिंदलच्या जयगड पोर्ट कंपनीने पक्‍की भिंत बांधल्याने ग्रामस्थांच्या 4 दिंड्यांची पारंपरिक वाट बंद झाली आहे. त्यामुळे नांदिवडे गावासह इतर तीन वाड्यांमधील दिंड्या भिंतीजवळ आल्या. टाळ, मृदुगांच्या गजरात भजने करुन भिंतीजवळच गार्‍हाणे घालून नारळ दिले. गेल्या वर्षीपर्यंत हे नारळ भिंतीपलीकडे असणार्‍या औदुंबरांच्या झाडाजवळ नारळ देण्याची प्रथा होती.

जयगड पोर्ट कंपनीने चिरेबंदी भिंत घातल्याने नांदिवडेवासियांची गावातील प्रमुख कर्‍हाटेश्‍वर मंदिराकडे जाणारी पाखाडीची वाट बंद झाली. याच मार्गाने श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी ग्रामस्थ दिंडी घेऊन मंदिरात जातात. याच वाटेत असणार्‍या औदुंबराच्या झाडाजवळ नारळ देऊन सर्व दिंड्या कर्‍हाटेश्‍वर मंदिराकडे जाण्याची प्रथा आहे. कर्‍हाटेश्‍वर मंदिरात वर्षभरात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. पाडव्याच्या दिवशी याच जवळच्या पाखाडी मार्गाने मंदिरात जाऊन कर्‍हाटेश्‍वराला नारळ अर्पण करतात. गावातील नवविवाहित दाम्पत्यही याच मार्गाने मंदिरात जाण्याची रीत आहे.

नांदिवडे ग्रुप ग्रामपंचायतीत मोडणार्‍या नांदिवडे कुणबीवाडी, संदखोल, कचरे गावातील ग्रामस्थांना मंदिरात जाण्यासह इतर चालीरिती जोपासण्यासाठी हाच मार्ग सोयीचा वाटत होता. परंतु, पोर्ट कंपनीने या मार्गावर भिंत घातल्याने ग्रामस्थांसमोर पेच निर्माण झाला. बंद झालेली वाट कोणाच्या अधिकार क्षेत्रात मोडते, याबाबतचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. भिंतीमुळे जुन्या परंपरा खंडित होऊ नयेत, यासाठी पहिल्या श्रावणी सोमवारी नांदिवडेसह गावातील भंडारवाडी, अंबूवाडी, कुणबीवाडीतील ग्रामस्थांनी 4 वेगवेगळ्या दिंड्या काढल्या.

सकाळीच टाळ, मृदुंगांच्या गजरात भजन म्हणत सर्व दिंड्या पारंपरिक पण बंदिस्त झालेल्या पाखाडी वाटेवरच्या भिंतीजवळ आल्या. गावचे युवा नेते विवेक सुर्वे आणि सहकारी प्रमुख ग्रामस्थांनी हे एक प्रकारचे दिंडी आंदोलन शांततेत होण्यासाठी पुढाकार घेतला होता. भिंतीजवळ दीड-दोन तास दिंडीतील ग्रामस्थांनी भजने म्हटली. भिंतीपलीकडील ज्या औदुंबर झाडांजवळ नारळ द्यावा लागतो तो नारळ त्या भिंतीजवळच देऊन गार्‍हाणे घालण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी रस्ता मार्गाने काहीसे जास्त अंतर कापून कर्‍हाटेश्‍वर मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले.