Tue, Jul 23, 2019 02:08होमपेज › Konkan › टाटा ट्रस्टच्या माध्यमातून डिजिटल शाळांचा 26 रोजी शुभारंभ 

टाटा ट्रस्टच्या माध्यमातून डिजिटल शाळांचा 26 रोजी शुभारंभ 

Published On: Jan 23 2018 10:24PM | Last Updated: Jan 23 2018 9:38PMकणकवली : प्रतिनिधी

टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कणकवली विधानसभा मतदार संघातील 100 शाळा डिजिटल करण्याचा व वाभवे-वैभववाडी शहर विकास प्रकल्पांचा शुभारंभ शुक्रवार 26 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वा. भगवती मंगल कार्यालय येथे होणार आहे. तर सिंधुदुर्गातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना युपीएससी, एमपीएससी परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी 4 फेब्रुवारी रोजी इंजिनिअरींग कॉलेज येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमांचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते व माजी खा. निलेश राणे यांच्या उपस्थितीत केला जाणार असल्याची माहिती आ. नितेश राणे यांनी दिली. 

आ. नितेश राणे म्हणाले, टाटा ट्रस्टच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 100 शाळा डिजिटल केल्या जाणार आहेत. या शुभारंभ कार्यक्रमाला त्या त्या शाळांचे व्यवस्थापन समिती  पदाधिकारी आणि शिक्षकांना निमंत्रित  करण्यात आले आहे. यावेळी टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी डिजिटल शाळांचे कामकाज कसे चालेल, त्याचे फायदे काय, याबाबतचे मार्गदर्शन ते करणार आहेत. टाटा ट्रस्टने वाभवे-वैभववाडी शहराच्या विकासाची जबाबदारी घेतली आहे. त्यात प्रामुख्याने पाणी शुध्दीकरण प्रकल्पाचा शुभारंभ देखील 26 जानेवारी रोजी केला जाणार आहे. तसेच टाटा ट्रस्टने देवगड शहरात बालोद्यान उभारण्याची जबाबदारी घेतली आहे. 

सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना एमपीएससी, युपीएससी परीक्षांबाबत मार्गदर्शन व्हावे यासाठी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण शिबिर युनिक अ‍ॅकॅडमी पुणे यांच्या मार्फत 4  फेब्रुवारीला आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 11 ते 5 यावेळेत इंजिनिअरींग कॉलेजच्या ऑडिटेरीअल हॉलमध्ये या शिबिराचा शुभारंभ होणार आहे.  प्रा. तुकाराम जाधव हे स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, मानसिकता कशी करावी याबाबत  या मार्गदर्शन करणार आहेत.  प्रा. प्रवीण चव्हाण, प्रा. देवा जाधवर, डॉ. अमित अहिरे हे शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत.