Mon, Nov 19, 2018 21:31होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात होणार माकडताप आजाराचे निदान 

सिंधुदुर्गात होणार माकडताप आजाराचे निदान 

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 22 2018 11:05PMकणकवली : अजित सावंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून माकडतापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्गसाठी मंजूर करण्यात आलेल्या रेण्वीय निदान प्रयोगशाळेत या माकडतापाच्या आजाराचे  निदान तातडीने करण्यासाठी नियमित 8 पदे व 31 काल्पनिक कुशल पदे भरण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. सिंधुदुर्गसाठी निश्‍चितच  दिलासा देणारा हा निर्णय आहे. 

जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून विशेषतः सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांत माकडतापाचे रुग्ण आढळून  येत आहे. यामध्ये काहींचा बळी गेला आहे.  तर  गेल्या पंधरा वर्षांत लेप्टोस्पायरोसीस तापसरीमुळे शेकडो जणांचे बळी गेले होते. त्यामुळे तातडीने या आजारांच्या निदानासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी होत होती. या पार्श्‍वभूमीवर या आजारांचे गांभीर्य विचारात घेऊन गतवर्षीच्या अर्थसंकल्पीय भाषणात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी डेंग्यू, चिकनगुनिया, जापनीज एन्सेफालायटीस, मेंदूज्वर, विषमज्वर, पटकी, घटसर्प, शिगेला डिसेंट्री, व्हायरल हेपॅटायटीस ए व ई, लेप्टोस्पायरोसिस या दहा आजारांबरोबरच माकडताप आजाराचे निदान करण्याची सुविधा प्राधान्याने करण्यासाठी  पदनिर्मितीची घोषणा केली होती. त्यानंतर आरोग्य सेवा संचालक यांच्या 8 डिसेंबर 2017 च्या प्रस्तावाच्या अनुषंगाने उच्चस्तरीय सचिव समितीने दिलेल्या मान्यतेस अनुसरून रेण्वीय निदान प्रयोगशाळा सिंधुदुर्ग येथे पदनिर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

यातील नियमित पदांमध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी-1 पद, वैद्यकीय अधिकारी - 1 पद, प्रशासकीय अधिकारी वर्ग 2 - 1 पद, सांख्यिकी अन्वेषक -1 पद, किटक समहारक-1 पद, वरिष्ठ लिपिक-2 पदे, कनिष्ठ लिपिक/टंकलेखक -1 पद, काल्पनिक कुशल पदांमध्ये वैद्यकीय शास्त्रज्ञ (मायक्रो), अवैद्यकीय शास्त्रज्ञ (मायक्रो), मायक्रो बायोलॉजिस्ट, ग्रेटेनरी ऑफिसर, अ‍ॅन्टॉमॉलॅजिस्ट यांचे प्रत्येकी 1 पद, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 5 पदे, आरोग्य सहायक 1 पद, प्रयोगशाळा सहायक 4 पदे, कनिष्ठ लिपिक/टंकलेखक 2 पदे, वाहनचालक 2 पदे, प्रयोगशाळा परिचर 6 पदे आणि शिपाई 6 पदे तर काल्पनिक अकुशल पदांमध्ये सफाईगार 4 पदे, पहारेकारी 2 पदे अशा एकूण 45 पदांचा समावेश आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी हे या प्रयोगशाळेचे कार्यालय प्रमुख असणार आहेत.

पद भरतीची प्रत्यक्ष कार्यवाही तातडीने हवी

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सिंधुदुर्गात माकडतापाबरोबरच डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरोसीस आदी दहा आजारांचे तातडीने निदान होणार आहे. मात्र, त्यासाठी ही पदे लवकरात लवकर भरून प्रयोगशाळा कार्यान्वित होणे आवश्यक आहे. सिंधुदुर्गात  चार वर्षांपूर्वी सावंतवाडी आणि कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ट्रॉमा केअर युनिट मंजूर करून त्याचे कक्ष उभारण्यात आले. त्यासाठी मशिनरीही आणण्यात आली. मात्र, या ठिकाणी वैद्यकीय तज्ज्ञ व आवश्यक पदांची भरती न झाल्याने सध्या ही ट्रॉमा केअर युनिट धूळखात पडली आहे. ट्रॉमा केअर प्रमाणे या प्रयोगशाळेच्या बाबतीत  तसे घडू नये, एवढीच अपेक्षा आहे. 

 

Tags : Sindhudurg, Sindhudurg news, Monkey fever,