Fri, Mar 22, 2019 01:27
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › ढोलताशा पथकांना आतुरता बाप्पांच्या आगमनाची

ढोलताशा पथकांना आतुरता बाप्पांच्या आगमनाची

Published On: Aug 14 2018 1:07AM | Last Updated: Aug 13 2018 10:49PMरत्नागिरी : प्रतिनिधी

लहानग्यांसह तरुणाईमध्ये ढोल-ताशा या पारंपरिक वादनाची मोठी क्रेझ पहायला मिळत आहे. गणपती सण जवळ आल्याने तर जिल्ह्यातील ढोलताशा पथके जोमाने तयारीला लागली आहेत.

पारंपरिक संस्कृती टिकावी आणि तरुणांमध्ये विविध कौशल्यांचा विकास व्हावा, या द‍ृष्टीने जिल्ह्यातील अनेक ढोल-ताशा-ध्वज पथक प्रयत्न करत आहेत. सध्या गणपतीसाठी नवीन लय, ठेका व ताल शिकण्यासाठी बहुतांश ढोलताशा पथकांतील सदस्य सध्या सरावातून मेहनत घेत आहेत.

डीजे व डॉल्बीपेक्षा आता पारंपरिक वाद्यांकडे सगळेच जण आकृष्ट होत आहेत. गणेश चतुर्थी, शिवजयंती, शिवराज्याभिषेक, नवरात्र, पाडवा अशा विविध सणांमध्ये हमखास ढोल-ताशा पथक आपल्या पारंपरिक कलेचा नमुना सादर केला जातो. काही ढोलताशा पथक अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवतात. गणपतीमध्ये गणेशापुढे मानवंदना दिली जाते.

गणपतीनिमित्त जवळपास दीड ते दोन महिने आधीपासून सराव सुरू  होतो. सदस्यांना सरावासाठी नियमित हजर राहून मेहनत घ्यावी लागते. काही पथक सदस्यांकडून शुल्क घेतात तर काही घेत नाहीत. बहुतांश ढोल पथक आपला नवीन ठेका व ताल यांचा वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न करतात. यात पारंपरिक ताल असतात. याला पारंपरिक हात चालवणे असेही म्हटले जाते. ऐकणारे आनंदी होऊन डोलू व नाचू लागतील, अशा ठेक्यांना अधिक पसंती मिळते. प्रत्येक ढोल-ताशा पथकाचे स्वतःचे असे काही नियम असतात. ते प्रत्येक सदस्यांना पाळावे लागतात. त्यामध्ये व्यसनाधिनता व गैरवर्तन चालत नसल्याचे मंडळांकडून सांगण्यात येते.