Sun, Mar 24, 2019 08:18होमपेज › Konkan › जयगड-डिंगणी मार्गाविरोधात धडक मोर्चा 

जयगड-डिंगणी मार्गाविरोधात धडक मोर्चा 

Published On: Dec 11 2017 1:30AM | Last Updated: Dec 10 2017 9:46PM

बुकमार्क करा

संगमेश्‍वर :  वार्ताहर

प्रस्तावित डिंगणी-जयगड रेल्वे मार्गाविरोधात आता डिंगणी ग्रामस्थ आक्रमक झाले असून, ग्रामस्थांना विश्‍वासात न घेताच ठेकेदाराला पाठीशी घालत प्रशासन करीत असलेल्या अन्यायाविरोधात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहेत. याबाबतचे निवेदन प्रशासनाला दिले आहे.

रेल्वे मार्गाविरोधात खाडीपट्ट्यातील 9 गावांनी संघर्ष कृती समिती स्थापन केली आहे. गेल्या आठवड्यात या समितीने 700 ग्रामस्थांना सोबत घेत तालुक्यातील देण येथे ठिय्या आंदोलन करून  रेल्वे मार्गाचे काम बंद पाडले होते. 

ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे मार्गासाठी जमीन संपादित करण्याची नोटीस मिळाल्यापासूनच येथील ग्रामस्थांनी प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे. त्यानंतर केलेल्या पत्रव्यवहारात प्रशासनाने ग्रामस्थांना कोणताही त्रास होणार नाही वा जबरदस्तीने प्रकल्प लादला जाणार नाही, भूसंपादन करताना ग्रामस्थांना प्रकल्पाचा आराखडा दाखवून मगच पुढचे काम होईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, संबंधित ठेकेदाराने ग्रामस्थांच्या खासगी जागेवरच अतिक्रमण केले आहे. शेतकर्‍यांना धमक्याही दिल्या असल्याचा संघर्ष समितीचा आक्षेप आहे. या विरोधात केलेल्या तक्रारींची प्रशासनाने दखल तर घेतली नाहीच, उलट जिंदलचे अधिकारी व ठेकेदार सातत्याने ग्रामस्थांना धमकावत  आहेत.

या कामासंदर्भात ठेकेदार व कंपनीशी प्रशासनाचे साटेलोटे असून, ग्रामस्थांचे काही देणे-घेणे नसल्याचे  निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर डिंगणी सरपंच मिलिंद खाडे, पोलिसपाटील जितेंद्र ओगले, सुदर्शन मोहिते, शंकर करंडे, सखाराम खाडे, श्रपत खाडे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.