Wed, Apr 24, 2019 11:53होमपेज › Konkan › डेरवणमधील विकास प्रकल्प क्रांतिकारक 

डेरवणमधील विकास प्रकल्प क्रांतिकारक 

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 13 2018 11:37PM

बुकमार्क करा
चिपळूण : प्रतिनिधी

डेरवण परिसरामध्ये विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेले जनसेवेचे कार्य कोकणच्या विकासामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणणार आहे. सद‍्गुरू दिगंबरदास महाराज व प. पू. काका महाराज यांच्या या कार्यासमोर मी नतमस्तक आहे. डेरवण येथे सुरू असलेले हे प्रकल्प शिक्षण, आरोग्य व क्रीडा विकासात मोलाची भर टाकतील, असे प्रतिपादन राज्याचे गृह, अर्थ व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात बजाज इन्सेव्हच्या वतीने कॅथलॅब सेंटरचा प्रारंभ ना. केसरकर यांच्या हस्ते झाला. यावेळी उद्घाटनपर भाषणात ना. केसरकर  बोलत होते. यावेळी त्यांनी सद‍्गुरु दिगंबरदास महाराज, भक्‍तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर यांच्या धोरणाचे कौतुक केले व त्यांचा वसा प. पू. काका महाराज व विश्‍वस्त विकास वालावलकर तेवढ्याच तन्मयतेने सुरू ठेवत आहेत, याबद्दल त्यांनी या सर्व कार्याप्रती आपण नतमस्तक असल्याचे सांगितले. हे ईश्‍वरी कार्य असून सेवा आणि आशीर्वादाची सांगड येथे घातली जात आहे.

गोरगरिबांना अल्पदरात मिळणारी रुग्णसेवा एवढ्यापुरतेच हे काम नसून संपूर्ण कोकणात व्यापक आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी वालावलकर रुग्णालय करीत असलेल्या प्रयत्नांचे ना. केसरकर यांनी कौतुक केले. शिवाय उच्च दर्जाचे शिक्षण, खेळाला उत्तेजन, वैद्यकीय रुग्णालय व विविध नर्सिंग कोर्सेसच्या माध्यमातून कोकणातील तरूण-तरूणींना मिळत असलेली शिक्षणाची संधी हे अलौकीक कार्य आहे, असे मत त्यांनी व्यक्‍त केले. कोकणच्या विकासामध्ये डेरवणमधील हे प्रकल्प मैलाचा दगड ठरतील, अशी अपेक्षाही ना. केसरकर यांनी व्यक्‍त केली.

बजाज समूहाचे ‘सीएसआर’ विभागाचे प्रमुख सी. पी. त्रिपाठी म्हणाले, बजाज समूहाने कॅथलॅब सेंटरसाठी चार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे. बजाज समूहाची मदत योग्य त्या कार्यासाठी व योग्य त्या संस्थेकडे केली आहे, याबद्दल आपल्याला समाधान वाटते. कोकणामध्ये डेरवण ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे आपण भारावलो आहोत. कोकणातील खेड्यापाड्यांत  गोरगरीब रुग्णांपर्यंत या ट्रस्टची वैद्यकीय सुविधा पोहोचली आहे. रुग्णांना वैद्यकीय सेवेसाठी उद्युक्‍त केले जात आहे. शिवाय या परिसरात सुरू असलेले प्रकल्प ही खूप अवघड गोष्ट आहे. परंतु, बदलाचा ध्यास घेतलेली मंडळीच हे कार्य साकारू शकतात. अफाट कार्यक्षमता असलेली मंडळी या ट्रस्टकडे असल्याने व त्याचे सुकाणू प. पू. काका महाराज यांच्या नेतृत्वाखाली असल्याने हे साध्य झाले.  समाजातील सर्व घटकांसाठीच आरोग्य सेवा अल्प दरात सुरू असल्याने गोरगरिबांना त्याचा फायदा होणार आहे. बजाज परिवारही आपल्या निधीचा योग्य विनियोग होणार असल्याने समाधानी असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.
प्रारंभी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सुवर्णा पाटील यांनी रुग्णालयाच्या आरोग्य सुविधांचा आढावा घेतला.

आता जनतेतही वैद्यकीय सुविधा मिळविण्यासाठी जनजागृती होत असल्याचे सांगितले. ट्रस्टचे विश्‍वस्त विकास वालावलकर यांनी आपल्या भाषणामध्ये ट्रस्टच्या डेरवण परिसरातच नव्हे तर कोकणात सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. गेल्या 48 वर्षांतील चालवल्या जाणार्‍या योजनांचा आढावा घेतला. खडतर आर्थिक संकटातूनही सद‍्गुरु दिगंबरदास महाराज, प. पू. काका महाराज यांच्या आशीर्वाद व प्रेरणेने कुणाकडेही हात न पसरता हे भव्य दिव्य सेवा प्रकल्प राबविणे शक्य झाल्याचे नमूद केले. एकेकाळी दुर्गम असलेला डेरवण आज कोकणच्या आरोग्य, क्रीडा व शिक्षण केंद्राचे केंद्रबिंदू ठरत असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.