Sun, Aug 18, 2019 20:55होमपेज › Konkan › उजगावातील 11 वाड्यांचा पाणीप्रश्‍न ऐरणीवर

उजगावातील 11 वाड्यांचा पाणीप्रश्‍न ऐरणीवर

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 09 2018 11:06PM

बुकमार्क करा
देवरुख  : वार्ताहर

शासनाचे दुर्लक्ष आणि विविध सोयी-सुविधांच्या अभावामुळे  संगमेश्‍वर तालुक्यातील ‘उजगाव’ या गावचा विकास मंदावला आहे. गावच्या विकास कामांसाठी शासनाकडून कोणताच निधी मिळत नसल्याने येथील ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्ता, आरोग्य विषयक  समस्यांबरोबरच सध्या या गावातील पाणीप्रश्‍न ऐरणीवर आला आहे.  तालुक्यातील देवरुख शहरापासून सुमारे 18 कि.मी. अंतरावर उंच-सखल भागावर निसर्गरम्य परिसरात हे गाव वसलेले आहे. या गावाला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहे. असे असले तरी प्राकृतिक रचनेचा विचार केला असता हा गाव विखुरलेला आहे.

सुमारे 2 हजार 200 इतकी या गावची लोकसंख्या असून शेवरवाडी, ब्राह्मणवाडी, बौद्धवाडी, बडदवाडी, गुरववाडी, सुतारवाडी, तेलेवाडी, कानसरेवाडी, नवेलेवाडी, भोवरीचीवाडी, पिंगळेवाडी व गवळवाडी आदी विखुरलेल्या वाड्या मिळून हा गाव या ठिकाणी वसलेला आहे. या गावामध्ये सन 1995 मध्ये सुरु करण्यात आलेल्या नळपाणी योजनेचा लाभ गावातील शेवरवाडी वगळता उर्वरित 11 वाडीतील सुमारे 1 हजार 500 नागरिक घेत आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेतील लोखंडी व सिमेंट पाईप लाईनची दुरुस्ती न झाल्याने ही पाईपलाईन सध्या ठिकठिकाणी गंजलेल्या स्थितीत व अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार शासन दरबारी आपली कैफियत मांडली. मात्र, त्याकडे दुर्लक्षच केले गेले.

गावापासून सुमारे 4 ते 5 कि.मी. अंतरावरील ओढ्याजवळील विहिरीतील पाणी पाईपलाईनद्वारे वाडीतील साठवण टाकीत सोडले जाते. मात्र, गंजलेली पाईपलाईन व अनेक ठिकाणी गळती असलेल्या या साठवण टाकीमुळे हे पाणी वाया जात असून ग्रामस्थांच्या वाट्याला दिवसाला फक्त दोन ते तीन हंडे इतकेच पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असणार्‍या वाड्यांना पाणी प्रश्‍नाला सामोरे जावे लागत आहे. गावातील बिकट रस्ते व पायवाटा, नेटवर्क आदी सुविधांच्या अभावाबरोबर येथील पाणी प्रश्‍न सध्या जटील बनला आहे. गावच्या विखुरलेल्या प्राकृतिक रचनेमुळे प्रशासनाकडून ग्रा. पं. कडे उपलब्ध होणारा निधी गावच्या विकासासाठी पुरेसा नाही, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे असून निधीच्या अभावामुळे गावातील फार जूनी, पूर्णपणे गंजलेले व मोडलेली पाईपलाईनची स्वतः ग्रामस्थच श्रमदान व स्वखर्चातून दुरुस्ती करत पाणी समस्येला सामोरे जात आहेत.