Sat, Aug 24, 2019 23:16होमपेज › Konkan › धामापूरतर्फे देवरुख प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी

धामापूरतर्फे देवरुख प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 09 2018 11:16PM

बुकमार्क करा
देवरुख : वार्ताहर

संगमेश्‍वर तालुक्यातील  धामापूर तर्फे देवरुख प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व काही कर्मचारी पदे रिक्त असल्याने येथील रुग्णसेवा कोलमडलेली दिसत आहे. येथे असलेल्या एकाच वैद्यकीय अधिकार्‍यावर येथील कामाचा ताण पडत असून याचा फटका येथील रुग्णसेवेला बसत आहे. आरोग्य यंत्रणेने येथील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी ताम्हाने पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून होत आहे. 
या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आंबवली, नांदळज, निवेबुद्रूक, तुळसणी, वाशी, पूर अशा सहा आरोग्य उपकेंद्रांचा कारभार चालत असून या प्राथमिक आरोग्य केंद्रावर परिसरातील सुमारे 20 ते 25 गावे अवलंबून आहेत. डॉ. अशोक लवटे हे येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून गेली अनेक वर्षे सेवा बजावत आहेत.

हे रुग्णालय आरोग्य विभागाच्या 24 बाय 7 अशा सेवेत समाविष्ट करण्यात आले असल्याने येथे रुग्णांना 24 तास सेवा देणे बंधनकारक आहे. मात्र, सध्या या आरोग्य केंद्रात केवळ एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. या अधिकार्‍यावर येथील कामाचा ताण पडत असून याचा फटका रुग्णसेवेला बसत आहे. नियमित कामकाज सांभाळून कार्यालयीन बैठकी, डॉक्टर आपल्या गावी या योजनेंर्गत कार्यक्षेत्रात फिरणे तसेच विद्यार्थी तपासणी शिबिर व उपकेंद्र भेटी आदी कामासाठीही येथील कार्यरत बैद्यकीय अधिकार्‍यांना वेळ द्यावा लागतो. अशावेळी अनेकवेळा वैद्यकीय अधिकारी नसल्याने परिसरातील 10 ते 15 कि.मी.अंतरावरुन या प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांना परत फिरावे लागते. त्याचप्रमाणे या केंद्रात वैद्यकीय अधिकार्‍याप्रमाणेच आरोग्य सहाय्यक एक पद, आरोग्य सेविका एक पद, आरोग्य सेवक तीन पदे आणि शिपाई एक पद अशी एकूण 7 पदे रिक्त आहेत. 

या प्राथमिक आरोग्य केंद्रात साधारणपणे एका दिवसाला 60 ते 70 ओपीडी असते. यावरुन येथे दोन वैद्यकीय अधिकार्‍यांची गरज असल्याचे दिसून येते. सध्या मात्र या ठिकाणी एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून एक पद रिक्त आहे. या पदाबरोबर अन्य 6 पदेही या ठिकाणी रिक्त असून यामुळे येथील आरोग्य सेवा कोलमडली आहे. संबंधित आरोग्य यंत्रणेने येथील रुग्णांची ही गैरसोय लक्षात घेऊन येथील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.