Mon, Aug 19, 2019 11:31होमपेज › Konkan › देवरूखला गरज अग्निशमन यंत्रणेची

देवरूखला गरज अग्निशमन यंत्रणेची

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 27 2018 8:46PMदेवरूख: प्रतिनिधी

देवरूख बाजारपेठेतील भारत बेकरीला सोमवारी पहाटे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. यापूर्वीही देवरूखमध्ये आगीने नुकसान होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नुकसान टाळण्यासाठी देवरूख नगर पंचायतीने लवकरात लवकर अग्नीशमन यंत्रणा सुरू करावी, अशी मागणी देवरूख शहर मनसेतर्फे करण्यात आली असून तशा आशयाचे निवेदन मुख्याधिकार्‍यांना देण्यात आले.

देवरूख शहरात आग लागण्याचे प्रसंग अनेकवेळा घडले. मात्र आग आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येकवेळी रत्नागिरी नगर परिषद किंवा इतर ठिकाणच्या बंबाची वाट पहावी लागते. बंब येण्यासाठी बराच विलंब होतो. तोपर्यंत खूप नुकसान होते. सोमवारी पहाटे 4 वा. देवरूख शहरात आगीची घटना घडली. शहरातील हनिफ हरचिरकर यांचे बाजारपेठेमधील भारत बेकरी आगीत जळून भस्मसात झाली. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. 

बेकरीला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी देवरूख न. पं. कडे कोणतीच यंत्रणा नसल्यामुळे बेकरी आगीत जळून खाक झाली. तर नागरिकांनी केलेले प्रयत्न तोकडे पडले. न. पं. ने अद्यापही अग्नीशमन यंत्रणा उपलब्ध न केल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे. मनसेने या समस्येवर आवाज उठवला असून न. पं. ने इतक्या वर्षात अग्नीशमन यंत्रणेची ठोस उपाययोजना का केली नाही? असा सवाल मनविसेचे शहराध्यक्ष ऋतुराज देवरूखकर यांनी केला आहे. 

दुसरीकडे शहरातील पथदीप बंद स्थितीत असल्यामुळे हे पथदीप न. पं. ने तत्काळ सुरू करावे, अशी मागणीही शहर मनसेतर्फे करण्यात आली आहे. न. पं. ने अग्नीशमन यंत्रणा उपलब्ध करावी व बंद पथदीप सुरू करावे, अशा मागणीचे निवेदन शहर मनसेच्या वतीने न. पं. चे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांना सादर करण्यात आले. यावेळी 

मनसेचे शहराध्यक्ष सागर संसारे, मनविसे तालुकाध्यक्ष सिध्देश वेल्हाळ, विभाग अध्यक्ष अक्षय झेपले, शुभम कोवळे, मनिष केदारी उपस्थित होते. आगीच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.