होमपेज › Konkan › विहिरीत कोसळलेल्या बिबट्याला जीवदान 

विहिरीत कोसळलेल्या बिबट्याला जीवदान 

Published On: Mar 16 2018 10:54PM | Last Updated: Mar 16 2018 10:54PMदेवरुख : प्रतिनिधी

भक्ष्याचा पाठलाग करताना देवरुखनजीकच्या वायंगणे नवेलेवाडी येथील विठ्ठल बाबू नवेले यांच्या घराजवळील विहिरीत बिबट्या कोसळला. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याची माहिती मिळताच शुक्रवारी पहाटे वनविभागाचे अधिकारी, वनरक्षक तसेच ग्रामस्थांच्या मदतीने या बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. ती अडीच वर्षांची मादी होती. वायंगणे नवेलेवाडीतील विठ्ठल नवेले यांच्या घराजवळील  विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती सरपंचानी दूरध्वनीवरुन वनविभागाला दिली. यावर अधिकारी, वनरक्षक यांनी पिंजर्‍यासह नवेलेवाडीत जाऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने या मादीला सुखरुप बाहेर काढले.

परीक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरीचे निलख, विभागिय अधिकारी जगताप, देवरुख परिक्षेत्राचे गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही बचाव मोहीम राबवण्यात आली. यावेळी वनरक्षक सागर गोसावी, लहू कोळेकर, दिलीप आरेकर, विक्रम कुंभार, राहुल गुंटे, गावडे यांनी कामगिरी पार पाडली.दूरध्वनीवरुन खबर देणारे सरपंच सुरेश घडशी तसेच  ग्रामस्थ संतोष कदम, दिलीप गुरव, सुलतान मालगुंडकर, रवी गोपाळ यांनी बिबट्या विहिरीतून बाहेर काढण्यास सहकार्य केले.
अडीच वर्षांची बिबट्या मादी पिंजर्‍यासह आधी देवरुख येथे आणण्यात आली व नंतर सुरक्षित अधिवासात सोडण्यात आली.