देवरुख : प्रतिनिधी
संगमेश्वर पंचायत समिती उपसभापतीचे अजित ऊर्फ छोट्या गवाणकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शहरातील मैत्री पेट्रोल पंप येथे बुधवारी वाहनचालकांना पेट्रोलमध्ये चक्क 5 रुपयांची सूट दिली. या
उपक्रमात नगरसेविका अनुष्का टिळेकर यांचाही सहभाग होता.
छोट्या गवाणकर यांच्या वाढदिवसानिमित्त दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांना सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पेट्रोलसाठी लिटरला पाच रुपये सूट ठेवण्यात आली होती. अजित गवाणकर, सौ. अनुष्का टिळेकर यांच्या या संकल्पनेचे वाहनचालकांनी कौतुक केले. वाहनचालकांनी मग या संधीचे सोने केले.
‘अच्छे दिन आये’ म्हणत वाहनांच्या इंधन टाक्या फुल्ल करुन घेतल्या. यामुळे देवरुखात दिवसभरात पेट्रोलची विक्रमी विक्री झाली आणि वाहनचालकांना ऐन गणेशोत्सवात फायदाही झाला. या अनोख्या उपक्रमामुळे मैत्री पेट्रोल पंपावर पेट्रोलचा 84 रुपये 38 पैसे असा दर पहायला मिळाला. पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. मात्र, देवरुखवासीयांना पाच रुपयांची सूट देऊन गवाणकर यांनी वेगळा संदेश दिला.