Sat, Aug 24, 2019 21:11होमपेज › Konkan › देवरुख, गुहागर न.पं.मध्ये भाजपचीच सत्ता येईल

देवरुख, गुहागर न.पं.मध्ये भाजपचीच सत्ता येईल

Published On: Dec 04 2017 1:37AM | Last Updated: Dec 03 2017 11:13PM

बुकमार्क करा

देवरूख : वार्ताहर

संगमेश्वर तालुका हा राजकारणाच्या दृष्टीने एकप्रकारे परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे. तालुकाध्यक्ष पदाची धुरा प्रमोद अधटराव यांनी स्वीकारल्यापासून तालुका  भाजपमय करण्यासाठी शतप्रतिशत त्यांनी सुरूवात केली असून आजचा पक्षप्रवेश म्हणजे आगामी निवडणुकीची नांदी आहे. देवरूख व गुहागर नगर पंचायतीवर  भाजपा निर्विवाद सत्ता प्रस्तापित करेल. तसेच, 2019 च्या विधान सभा निवडणूकीत भाजपचाच उमेदवार विजयी होईल. असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी देवरूख येथे व्यक्त केला.

संगमेश्वर तालुका भाजपाच्यावतीने संगमेश्वर-चिपळूण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा शहरातील चिंतामणी मंगल कार्यालयात शनिवारी सायंकाळी उशिरा झाला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री. माने म्हणाले की, केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असल्यामुळे विकास कामांचा धडाका सुरू आहे. त्यामुळे जनता भाजपच्या कामावर अत्यंत खूश आहे. देवरूचे नगराध्यक्ष नीलेश भुरवणे व उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये यांच्या माध्यमातून शहराच्या विकासावर भर दिला जात आहे. न. पं. चे उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये यांच्या  भाजपा प्रवेशामुळे देवरूखात भाजपाची ताकद आणखी वाढली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

तसेच पुढे बोलताना श्री. माने म्हणाले की, संगमेश्वर तालुका हा खर्‍या अर्थाने राजकारणाचा केंद्रबिंदू आहे आणि या केंद्रबिंदू स्थळी भाजपा पक्षामध्ये येणार्‍यांची संख्या प्रमोद अधटराव यांच्या माध्यमातून वाढत आहे. अधटराव यांच्या रूपाने भाजपाला कोहिनूर हिरा प्राप्त झाल्याचे ते म्हणाले. भाजपची ताकद वाढल्याने  आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा विचार करता ही विजयाची नांदी असल्याचे श्री. माने यांनी सांगितले. 

या वेळी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व माजी उपसरपंच यशवंत गोपाळ, उमेश शिवगण, दीपक खेडेकर, राष्ट्रीय कबड्डी पंच सुनील सालम, आनंद सार्दळ, सागर शेट्ये, योगेश लोध, अमर शेट्ये, अशोक कोटकर, राजा गवंडी, पांड्या आंबेकर, सीताराम बावधने, तांबेडी येथील राजू ब्रीद या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश केला.
या कार्यक्रमात माजी आमदार डॉ. विनय नातू म्हणाले की, चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन केले तर तालुक्यातील दोन महत्वाच्या गडनदी व गडगडी प्रकल्पांमुळे इंच  -इंच जमीन ओलिताखाली आली असती. मात्र, हे प्रकल्प अद्यापही पूर्ण न झाल्याने जेवढे पाणी मुरले तेवढाच प्रकल्पाला लागलेला निधी सत्ताधार्‍यांनी मुरवला असल्याचे घणाघाती टोला या पूर्वीच्या सत्ताधार्‍यांवर केला. त्यामुळे त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. तसेच या सरकारने आता सगळ्याच योजनांकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. या योजना गावागावात पोहोचवण्याचे काम सर्वच कार्यकर्त्यांनी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

 या मेळाव्यापूर्वी भाजपा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या हस्ते करण्यात आले. 

मेळाव्याप्रसंगी चिंतामणी सभागृहात व्यासपिठावर कोकण संपर्कमंत्री माजी आ. सतिश धोंड, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, जिल्हा उपाध्यक्ष वामनराव पवार, तालुका ध्यक्ष प्रमोद अधटराव, चिपळूण तालुकाध्यक्ष सतिश मोरे, देवरूख नगराध्यक्ष नीलेश भुरवणे, उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, चिपळूणचे निशिकांत भोजने, पक्ष विस्तारक संतोष शिंदे, महिला आघाडीच्या रश्मी कदम, जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद जोशी, संतोष केदारी, स्विकृत नगरसेवक सदानंद भागवत,  भाजच्या ओबीसी सेलचे सोनू कळंबटे, देवरूख शहराध्यक्ष सुधीर यशवंतराव, आदींसह भाजपाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन नगराध्यक्ष नीलेश भुरवणे यांनी केले.