Mon, Jun 17, 2019 04:10होमपेज › Konkan › देवरुखात भाजप, गुहागरात विकास आघाडी

देवरुखात भाजप, गुहागरात विकास आघाडी

Published On: Apr 13 2018 1:17AM | Last Updated: Apr 12 2018 10:25PMदेवरूख : वार्ताहर/ गुहागर : प्रतिनिधी

नगराध्यक्षपदी मृणाल शेट्ये यांची निवड

देवरूख नगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली असून नगराध्यक्षपदी भाजपच्या मृणाल शेट्ये विजयी झाल्या.  17 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजप-मनसे युतीने सर्वाधिक आठ जागांवर विजय मिळवला.  देवरूख नगरपंचायत निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे पानिपत करत भाजपचे ‘कमळ’ फुलले. भाजप- मनसे- आरपीआय युतीचे 8 नगरसेवक, शिवसेनेचे 4, काँगे्रसचा 1, राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपच्या मृणाल शेट्ये या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. काँगे्रस- राष्ट्रवादी-जनता दल-बहुजन विकास आघाडी-कुणबी सेना या आघाडीतील घटक असलेल्या काँगे्रसला 1, राष्ट्रवादीने 3 अशा चार जागा मिळवल्या आहेत. तर सेनेने केवळ चार नगरसेवक निवडून आणले आहेत.

सेनेला गत निवडणुकीत मिळालेले यश पाहता सेनेला नगरसेवकपदांची संख्या टिकवता आली नाही. ‘कमळ’ फुलण्यासाठी ‘मनसे’च्या इंजिनबरोबरच  ‘आरपीआय’ची साथ मिळाली. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांचा विचार करता काही ठिकाणी क्रॉस व्होटिंग झाल्याचे दिसून आले. याचा फायदा भाजपला झाला. अनुभवी तसेच प्रशासनाचा अभ्यास असलेल्या स्मिता लाड या राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार भाजपच्या मतांच्या रेट्यासमोर कमी पडल्या. 

नगराध्यक्षपदी राजेश बेंडल विराजमान

गुहागर नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीने राष्ट्रवादीचा पुरता धुव्वा उडविला. जनतेतून पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान आघाडीचे राजेश बेंडल यांना मिळाला असून 1130 एवढ्या विक्रमी मतांनी ते विजयी झाले. आघाडीला नऊ जागांवर यश मिळाले. त्या खालोखाल भाजपने सहा जागा जिंकल्या असून शिवसेनेला एक जागा मिळाली आहे. सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीला अवघी एक जागा जिंकता आली आहे. गुरुवारी सकाळी 10 वा. येथील रंगमंदिरात मतमोजणीला प्रारंभ झाला. यानंतर एकामागोमाग एक येणार्‍या निकालानंतर शहर विकास आघाडीमध्ये विजयाच्या लाटा उसळल्या. शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेश बेंडल यांना 2446, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे दीपक कनगुटकर यांना अवघी 1311, तर भाजपचे रवींद्र बागकर यांना 980 मते मिळाली. यामध्ये बेंडल यांचा तब्बल 1130 मतांनी एकतर्फी विजय झाला. 

नगरसेवकपदाच्या 17 जागांसाठी 47 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 16, भाजपचे 12, तर शहर विकास आघाडीचे 13 उमेदवार रिंगणात होते. या ठिकाणीही गुहागर शहर विकास आघाडीने बाजी मारली. प्रभाग 1 मध्ये राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका सुजाता बागकर 81 मतांनी निवडून आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विजयी झालेल्या या एकमेव नगरसेविका आहेत. अन्य सर्वच प्रभागांतील राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले. आघाडी, भाजप आणि सेनेच्या मैत्रीपूर्ण लढतीत राष्ट्रवादीचा टिकाव लागला नाही. राष्ट्रवादीचा धुव्वा तर उडालाच, शिवाय सेनेच्या जागाही कमी झाल्या.

Tags : Konkan, Devrukh, BJP, Guhagarat, Vikas Aghadi