Mon, Apr 22, 2019 03:41होमपेज › Konkan › मुसळधार पावसाने देवगड तालुका जलमय

मुसळधार पावसाने देवगड तालुका जलमय

Published On: Jun 20 2018 10:34PM | Last Updated: Jun 20 2018 10:06PMदेवगड : प्रतिनिधी

मुसळधार पर्जन्यवृष्टीने बुधवारी देवगड तालुक्यात रस्ते, घरे पाण्याखाली गेल्याने जनजीवन जनजीवन विस्कळीत झाले. मंगळवारी रात्री पडलेल्या धुव्वाँधार पावसाने कट्टा ते जामसंडे मार्ग  पाण्याखाली गेला. कुणकेश्‍वर-मिठबांव मार्गावर चांदेलवाडी येथील रस्ताही जलमय झाल्याने रस्ता उखडला. तर कुणकेश्‍वर चांदेलवाडी येथील चार घरांमध्ये रात्री पाणी शिरल्याने दोरीच्या सहाय्याने माणसांना बाहेर काढण्यात आले.  मुसळधार पावसाने रस्त्यांबरोबरच बागायतीही पाण्याखाली गेल्या.पडेल-विजयदुर्ग रस्त्यावर रामेश्‍वर काटे येथील दीडशे वर्षापुर्वीचा वटवृक्ष कोसळून रस्त्यावर पडल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. या घटनेत वीजपोल व विद्युतवाहीनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पावसाने मंगळवारी सायंकाळी 7.30 वा. पासून जोरदार बॅटींग केली. जराही उसंत न घेता दोन तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे देवगड - निपाणी मार्ग कट्टा ते जामसंडे दिर्बादेवी मंदीर स्टॉप व पेट्रोलपंप ते वडांब्यापर्यंत र् पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक दोन तास ठप्प होती. जामसंडे फाटकक्लास येथे जलमय झालेल्या रस्त्यावरून मार्ग काढताना दोन वाहने फसली.स्थानिक नागरिकांनी धाव घेवून दोन्ही वाहनांना व आतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

वाडा चांभारघाटी ते वाडा लायब्ररीपर्यंतचा मार्गही पाण्याखाली गेल्याने विजयदुर्ग मार्गावरील वाहतूक मंगळवारी रात्री दोन तास ठप्प होती. नारींग्रे पुलावरही पाणी आल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती.  कुणकेश्‍वर-मिठबांव मार्गावरील चांदेलवाडी येथील रस्ता पूर्णत: पाण्याखाली गेला. रस्त्यालगत असलेल्या दिलीप ताम्हणकर यांची माडबागायत पाण्याखाली जावून पाणी जोराने गडग्यावरून रस्त्यावरून वाहू लागल्याने रस्ता खचला.

कुणकेश्‍वर- चांदेलवाडी येथील रमेश यशवंत वातकर, मंगेश सदानंद वातकर, गुरूनाथ राजाराम साईम व सुहास सुधाकर नाणेरकर यांच्या घरात पाणी शिरले. यापैकी रमेश वातकर यांच्या घरातील माणसांना दोरीच्या सहाय्याने ग्रामस्थांनी घरातुन बाहेर काढले. दहिबांव- कुणकेश्‍वर रस्त्यावर दरड कोसळून माती रस्त्यावर आली. यामुळे या मार्गावरील वाहतूकही काही काळ ठप्प होती. जामसंडे -भटवाडी येथील मधुकर अनंत चिंदरकर यांच्या घराची भिंत कोसळून 10 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या.यामध्ये 19 हजाराचे नुकसान झाले. बुधवारी सकाळी 9 वा.नंतर पावसाने थोडा विसावा घेतला. मात्र सायंकाळी 6 वा. नंतर ढगांच्या गडगडाटासह पुन्हा पावसाने पुन्हा सुरूवात केली. 

हिंदळे रस्त्यावर विद्युतवाहीनी पडल्याने वाहतूक ठप्प

हिंदळे -मुणगे मार्गावर आगा दुकानालगत असलेल्या आगा यांच्या माडाला डंपरचा हुक लागून माड मुळासहीत विद्युतवाहीनींवर कोसळल्याने विद्युतवाहिनी तुटून रस्त्यावर पडल्या त्याबरोबर दोन पोलही वाकल्याने हिंदळे गावातील विद्युतपुरवठा बंद पडला.ही घटना बुधवारी 2 वा. च्या सुमारास घडली.विद्युतवाहीनी रस्त्यावर पडल्यामुळे तीन तास वाहतूक ठप्प होती. माड व विद्युतवाहीनी बाजुला केल्यानंतर वाहतूक सुरू झाली.मात्र, सायंकाळी वीजांच्या कडकडाटासह पावसाने सुरूवात केल्याने विद्युतपुरवठा सुरू करण्याचे प्रयत्नांना यश आले नाही.