Tue, Sep 25, 2018 11:01होमपेज › Konkan › राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी

राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

देवगड : प्रतिनिधी

वाढती महागाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, कोलमडलेली आरोग्ययंत्रणा या सर्वच पातळीवर राज्यसरकार अपयशी ठरले असून जनतेमधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे.याबाबत सरकारने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी केली.

देवगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने वाढती महागाई, आरोग्य, कर्जमुक्ति, भ्रष्टाचार या प्रश्‍नाबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील जनता सततच्या वाढत्या महागाईमुळे  बेजार आहे. शासनाचे महागाईवर नियंत्रण नाही. कर्जमुक्तीचे शेतकर्‍यांना गाजर दाखविले  मात्र त्यासाठी सर्व कागदपत्रे देवूनही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहीला आहे. शेतकर्‍यांना वेळेवर कृषीपंप मिळत नाही.

राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर नियंत्रण नसून आरोग्य यंत्रणा खिळखिळी बनली आहे. नोटाबंदी व जीएस्टीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या सर्व बाबींवर तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली. तालुकाध्यक्ष रशिद खान, माजी युवक जिल्हाध्यक्ष अभय बापट,  महिला तालुकाध्यक्ष सौ.नयना आचरेकर, नगरसेविका साक्षी वातकर, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विनायक जोईल, चंद्रकांत पाळेकर, माजी सरपंच पुनम मुणगेकर, सुधीर मांजरेकर, शिवप्रसाद पेडणेकर, बंटी कदम, शरद शिंदे, नागेश आचरेकर, वसंत मोहिते, किशोर पेडणेकर, रोहीत ढोके आदी उपस्थित होते.