Thu, Jun 27, 2019 13:51होमपेज › Konkan › पहिल्या टप्प्यातील आंबा फळाची मोठ्या प्रमाणात घळ

पहिल्या टप्प्यातील आंबा फळाची मोठ्या प्रमाणात घळ

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 05 2018 11:12PM देवगड  : प्रतिनिधी

गेले पंधरा दिवसांत आंबा घळ मोठ्या प्रमाणात झाल्याने बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून कलमांना नवीन मोहर येण्यास सुरूवात झाल्यामुळे  आंबापीक हंगाम मे महिन्यापर्यंत लांबणीवर जाण्याची भीती आहे. देवगड तालुक्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यापासून आंबा कलमांना मोहर येण्यास सुरूवात झाली. काही बागांमधील तयार झालेला आंबा बाजारपेठेत पाठविण्यात आला. मात्र गेल्या पंधरा दिवसांत मार्च महिन्यात तयार होणार्‍या आंब्याची घळ सुरू झाल्यामुळे बागायतदारांचे मोठ्या  प्रमाणात नुकसान झाले असून बागायतदार चिंताग्रस्त झाला आहे.

आंबा कलमांना सद्यस्थितीत  आंबे असलेल्या ठिकाणाहूनच नवीन मोहर आल्यामुळे  व कलमांना दुसर्‍या बाजूने म्हणजेच नवीन पालवी आलेल्या ठिकाणाहून मोहर आल्यामुळे झाडावर असलेल्या आंब्याची मोठ्या प्रमाणात घळ झाली व याचा फटका त्या बागायतदारांना बसल्याचे  बागायतदार संघाचे संचालक व शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष विद्याधर जोशी यांनी सांगितले. आंबा बागायतदारांसाठी हे दृष्टचक्र सुरू असून सध्या कलमांवर होत असलेल्या मोहरनिर्मितीचा आंबा मे महिन्यात तयार होईल.

मात्र, या आंब्याला दर चांगला मिळणार नाही व हे आंबे नाईलाजास्तव बागायतदारांना कॅनिंगला द्यावे लागणार आहेत.यामध्ये बागायतदारांचे प्रचंड नुकसान होणार आहे. मुळात नोव्हेंबर,डिसेंबरमध्ये आलेल्या मोहरामुळे फलधारणा चांगली झाली होती. आंबे तयार होवून बाजारपेठेत जात होते. याचदरम्यान सध्या सुपारीच्या आकाराएवढ्या तयार झालेल्या आंब्याची घळ झाल्यामुळे मार्च महिन्यातील बागायतदारांचे सर्व उत्पादन वाया गेले आहे.

गेल्या 15 दिवसांत 80 टक्के आंबा गळून पडला त्यामुळे बागायतदार हताश झाले आहेत. ओखी वादळाचा फार मोठा परिणाम आंबा पिकावर झाला नाही. मात्र, त्यावेळी पडलेल्या पावसामुळे आंब्यावर डाग पडले. आता मोहर निमिर्तीनंतर तयार होणारा आंबा हा मे महिन्यात मिळेल त्यावेळी आंब्याला दर नसेल असे विद्याधर जोशी यांनी सांगितले. एप्रिल, मे महिन्यात कर्नाटकमधील आंबा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येत असून तो आंबा देवगड व रत्नागिरी हापूस म्हणून विकला जात असल्यामुळे  आंबा बागायतदारांना त्याचा फटका बसत आहे.