देवगड : प्रतिनिधी
‘ओखी’ वादळाच्या निमित्ताने देवगड हे नौकांसाठी सुरक्षित नैसर्गिक बंदर म्हणून या बंदराचे महत्व वाढले आहे. त्यामुळे हे बंदर विकसित करण्यासाठी विशेष लक्ष देणार, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. बंदरात आश्रयासाठी आलेल्या परप्रांतीय नौकावरील खलाशांना महाराष्ट्र शासन व प्रशासनाकडून आवश्यक सोयीसुविधा पुरविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ना. केसरकर यांनी बुधवारी सकाळी देवगड बंदराला भेट देत ओखी वादळामुळे बंदरात आश्रयासाठी आलेल्या परप्रांतीय नौकांवरील कर्मचार्यांशी संवाद साधला. आ. वैभव नाईक, माजी आमदार अॅड. अजित गोगटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, पोलिस उपविभागीय अधिकारी पद्मजा चव्हाण, तहसीलदार वनिता पाटील, शिवसेना पजिल्हाप्रमुख विलास साळसकर, तालुकाप्रमुख मिलींद साटम, अॅड.प्रसाद करंदीकर, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, उपसभापती संजय देवरूखकर, पोलिस निरिक्षक जयकुमार सूर्यवंशी, बंदर अधिकारी श्री.ताम्हणकर, मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी श्री.वारूंजीकर आदी उपस्थित होते.
देवगड बंदर कार्यालयात बैठक
परप्रांतीय नौकांवरील कर्मचार्यांशी संवाद साधल्यानंतर ना. केसरकर यांनी देवगड बंदर कार्यालयात सर्व विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेतली. यावेळी परप्रांतीय नौकांना साहित्य पुरविण्यासाठी भाडेतत्वावर चार स्थानिक नौका घ्याव्यात अशा सूचना त्यांनी तहसीलदार व बंदर विभागाला केल्या.प्रत्येक नौकांचा सर्व्हे करून त्यांना आवश्यक धान्य, इंधन याबाबत माहिती घ्यावी व त्याप्रमाणे त्याचा पुरवठा करावा अशी सूचना त्यांनी केली.
मत्स्यव्यवसाय विभागाकडे पुरेसा कर्मचारी नसल्याबाबत मच्छीमारांनी लक्ष वेधले.तर सागर सुरक्षा रक्षक सहा महिने वेतनाविना आहेत याकडेही मच्छीमार नेते भाई खोबरेकर यांनी लक्ष वेधले.