Sun, May 19, 2019 22:00होमपेज › Konkan › आनंदवाडी प्रकल्पाला केंद्राची मंजुरी

आनंदवाडी प्रकल्पाला केंद्राची मंजुरी

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 12 2017 11:36PM

बुकमार्क करा

देवगड ः प्रतिनिधी

अनेक दिवस मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या देवगडमधील आनंदवाडी बंदर प्रकल्पाला अखेर केंद्र शासनाची मंजुरी मिळाली आहे. एकूण 88 कोटी 40 लाख रु. खर्चाच्या या प्रकल्पाला 12 कोटी रुपयांचा निधी कमी पडत होता. तो केंद्र सरकारने सागरमाला योजनेतून मंजूर केल्यामुळे आनंदवाडी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आ. प्रमोद जठार यांनी या प्रकल्पासाठी काही वर्षे सातत्याने प्रयत्न केले. आपल्याला यश मिळाल्याचा आनंद जठार यांनी  दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केला.  प्रथम स्थानिक ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता त्यांच्या मागणीप्रमाणे प्रकल्प लोकवस्तीपासून पुढे 500 मीटर सरकवावा यासाठी माजी आ. प्रमोद जठार यांनी प्रयत्न केले होते. 

प्रमोद जठार यांचा पाठपुरावा

हा प्रकल्प लोकवस्तीपासून पुढे 500 मीटर सरकविण्यात आला. मात्र पुरेसा निधी उपलब्ध होत नव्हता.  एकूण खर्चापैकी केंद्रशासन 25 कोटी रूपये व राज्यशासनाने उर्वरीत रक्कम 63.4 कोटी रूपये द्यावेत असे ठरले होते. त्यासाठी 63.4 कोटीच्या मंजुरीचे पत्र राज्य शासनाने केंद्रशासनाला देणे गरजेचे होते यासाठी प्रमोद जठार यांनी पाठपुरावा केला. त्याअनुषंगाने राज्यशासनाने 63.4 कोटी रूपये मंजुर करून मागील बजेटमध्ये 10 कोटी रूपयांची तरतुदही केली. 

केंद्राच्या 25 कोटींपैकी पन्नास टक्के म्हणजे साडेबारा कोटी रूपये केंद्रीय कृषी, मत्स्यव्यवसाय विभागाकडून तर उर्वरीत साडेबारा कोटी रूपये सागरमालामधून मंजुरीच्या प्रतिक्षेत होते. त्यापैकी कृषी विभागाकडून मिळणारे साडेबारा कोटी रूपये यापुर्वीच मंजुर झाले होते. त्यानंतर साडेबारा कोटी रूपये सागरमाला योजनेतुन मंजुर होण्यासाठी जठार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून ना.गडकरी यांनी याबाबत लक्ष घालून सागरमाला योजनेतुन प्रकल्पासाठी साडेबारा कोटी रूपये निधी मंजुर केला आहे.

या मंजुरीचे पत्र त्यांनी दिल्ली येथे केंद्रीय कृषी, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन मंत्री ना.राधामोहन यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी प्रमोद जठार उपस्थित होते. आनंदवाडी प्रकल्पाचा मार्ग आता मोकळ झाला असून नवीन वर्षात प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ होईल अशी अपेक्षा व्यक्त करीत आनंदवाडी प्रकल्पाबाबत 12 वर्षाची मॅरेथॉन जिंकल्याचा आनंद झाला आहे अशा भावना प्रमोद जठार यांनी व्यक्त केल्या.