Wed, Nov 21, 2018 15:18होमपेज › Konkan › टंचाई काळात देवगड, जामसंडेचा पाणीपुरवठा बंद करू!

टंचाई काळात देवगड, जामसंडेचा पाणीपुरवठा बंद करू!

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 05 2018 11:20PMदेवगड : प्रतिनिधी

दहिबांव अन्‍नपूर्णा नळयोजनेवरून देवगड व जामसंडे गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज 19 लाख लिटर पाणी उपसा केला जात असल्यामुळे याच ठिकाणी नळयोजना असलेल्या इतर 10 गावांचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. यामुळे टंचाईच्या शेवटच्या दोन महिन्यात देवगड व जामसंडे या दोन्ही गावांचा पाणीपुरवठा दहिबांव येथून बंद करण्यात येईल, असा इशारा पं. स. सदस्य सदाशिव ओगले यांनी  बैठकीत दिला. देवगड पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा किसान भवन सभागृहात सभापती जयश्री आडीवरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती संजय देवरूखकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब उपस्थित होते.

सदाशिव ओगले म्हणाले, दहिबांव अन्‍नपूर्णा नदीवर देवगड पूरक नळयोजनेबरोबरच दहिबांव, नारिंग्रे, मिठबांव, तांबळडेग, हिंदळे, किंजवडे आदी गावांच्या नळयोजना आहेत. देवगड नळयोजनेमार्फत दररोज 19 ते 20 लाख लिटर पाण्याचा उपसा होत असल्यामुळे इतर गावांचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. देवगड - जामसंडे गावातील किती लोक पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात व किती लोक बागायतींसाठी पाणी वापरतात याची श्‍वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करून टंचाईच्या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये दोन्ही गावांचा पाणीपुरवठा बंद करणार असा इशारा ओगले यांनी दिला.

देवगडमध्ये वाहनचालकांबरोबर वाहतूक पोलिस उद्दामपणे वागतात. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. मात्र, त्यांनी दखल न घेतल्यास वरिष्ठांचे लक्ष वेधावे अशी सूचना श्री. ओगले यांनी मांडली. देवगड तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील सौरपथदीपाच्या बॅटर्‍या चोरीस गेल्या आहेत त्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवकांनी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार द्यावी, अशी सूचना करण्यात आली.

केंद्रशाळा आरेेची इमारत धोकादायक स्थितीत असून या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांना सादर करावा व त्या ठिकाणी दोन वर्गखोल्यांसाठी नवीन इमारत बांधून देण्याची मागणी अजित कांबळे यांनी केली. माकडांच्या उपद्रवामुळे चांदोशी अंगणवाडीच्या छप्पराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, याकडेही कांबळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. ग्रामीण पाणीपुरवठा व एकात्मिक बाल विकास कार्यालयासाठी पं. स. आवारात जागा उपलब्ध करून देवूनही दोन्ही कार्यालये अद्याप स्थलांतरीत झाली नाही. याबाबत सदस्यांनी दोन्ही विभागाच्या अधिकार्‍यांना फैलावर घेतले.