Thu, Jul 18, 2019 17:21होमपेज › Konkan › मासळी उत्पादनात कमालीची घट

मासळी उत्पादनात कमालीची घट

Published On: May 13 2018 10:22PM | Last Updated: May 13 2018 10:11PMदेवगड : प्रतिनिधी

मान्सूनच्या पार्श्‍वभूमीवर समुद्रांतर्गत हालचाली तीव्र झाल्याने मासळी खोल समुद्रात स्थलांतरीत झाली आहे, यामुळे दैनंदिन मासळी उत्पादनात कमालीची घट झाली असून  मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे उन्हाळी सुट्टी बरोबरच कोकणी मेवा व मासळी भोजनाचा आनंद लुटण्याचा मनसुबा असलेले चाकरमाणी व पर्यटकांचा विरस होत आहे.  

मे महिन्यातील सुट्टीसाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी व पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्हा  गजबजला आहे. या सुट्टी कालावधीत गावी मासळीचा आस्वाद घेणार्‍या मंडळींची गर्दी  मासळी मार्केटमध्ये दिसून येते. मात्र मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे खवय्यांचे  हाल झाले आहेत.

सध्या कमी मासळीमुळे मासळीचे दरही गगनाला भिडले असून मासळीमार्केटमध्ये सुरमईसारख्या दर्जेदार मासळीचा दर 600 ते 700 रूपयांपर्यत पोहचला आहे. मासळी हंगाम येत्या 15 ते 20 दिवसात संपणार असल्याने  नौका सलग समुद्रात मच्छिमारीसाठी जात आहेत. मात्र मासळी मिळण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने मासळीचा दर वधारला आहे.सध्या लेप, काही प्रमाणात कोळंबी मिळते.तर न्हैय व कांडाळीद्वारे मच्छिमारी करणार्‍या नौकांना काही प्रमाणात तोवर, सुरमई यासारखी मासळी मिळते. मे महिन्यात खाडीतील मच्छिमारीला जोर असतो.दोन- तीन दिवसापूर्वी खाडीमध्येही गुंजली, पेडवे, शेंगटी अशाप्रकारचे मासे मिळत होते. हे मासे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती.या माशांना दरही चांगला मिळाला होता. मात्र दोन दिवसात हे मासे मिळणेही दुरापास्त झाले आहेत.  कालवे व मुळे यावर खवय्यांचा भर असून त्यांचेही दर वाढले आहेत.कमी प्रमाणात मिळणार्‍या कोळंबीचा मासळीमार्केटमध्ये 200 रूपये वाटाअसा दर आहे.सुक्या मासळीचे दरही वधारले असून दोनशे रूपयांना चार सुके बांगडे असा विक्रमी दर मिळत आहे. मासळी कमी  व गगनाला भिडलेले दर यामुळे मासळीचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या चाकरमान्यांना  आपला मोर्चा चिकनकडे वळवावा लागला आहे. आता पुन्हा एकदा खाडीतील मच्छिमारी चांगल्या प्रकारे सुरू होईल असे स्थानिक मच्छीमार नेते भाई खोबरेकर यांनी सांगीतले.