होमपेज › Konkan › देवगड सभापतींच्या पतीची गळफास लावून आत्महत्या

देवगड सभापतींच्या पतीची गळफास लावून आत्महत्या

Published On: Jun 21 2018 10:56PM | Last Updated: Jun 21 2018 10:45PMदेवगड : प्रतिनिधी

फणसगाव येथील जयवंत ऊर्फ भाई धोंडू आडीवरेकर (वय 51) यांनी राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी 1 ते 1.30 वा.च्या सुमारास घडली. भाई आडीवरेकर हे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व देवगड सभापती जयश्री आडीवरेकर यांचे पती होत. आत्महत्येचे निश्‍चित कारण समजू शकले नाही.

भाई आडीवरेकर हे गेले पाच ते सहा महिने मानसिक आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर कुडाळ येथे  उपचार सुरू होते. गुरुवार 21 जून रोजी त्यांच्या पत्नी सभापती जयश्री आडीवरेकर या देवगडमध्ये गेल्या होत्या, तर त्यांची बहीण विद्या ही दुपारी फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी गेली होती. मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या भाई आडीवरेकर यांनी घरात कोणीही नसल्याचे पाहून  घराच्या पुढील व मागील दारांना आतून कडी घालून मागील पडवीतील वाशाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून जीवनयात्रा संपविली.

फणसगाव आरोग्य केंद्रामध्ये गेलेली त्यांची बहीण विद्या ही दुपारी 2.30 वा.च्या सुमारास घरी आल्यानंतर घराच्या पुढील व मागील दोन्ही दरवाजांना आतमधून कडी होती म्हणून त्यांनी मागील खिडकीतून पाहिल्यानंतर भाई हे गळफास लावलेल्या स्थितीत दिसले.त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी राहणारा तिचा चुलतभाऊ धमेंद्र आडिवरेकर हे तेथे आले.त्यानंतर मागील सिंमेटचा दरवाजा काढून श्री.आडीवरेकर यांना गळफास लावलेल्या स्थितीत खाली उतरविले मात्र त्यांचा मृत्यु झाला होता.घटना समजताच फणसगांवमधील नागरिकांनी आडीवरेकर यांच्या घराकडे धाव घेतली.भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार अ‍ॅड.अजित गोगटे, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व अन्य पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

घटनास्थळी विजयदूर्ग पोलिस दाखल झाल्यानंतर त्यांनी पंचनामा करून फणसगाव प्रा.आ.केंद्रामध्ये शवविच्छेदन करण्यात आले.त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.