Sat, Aug 17, 2019 16:49होमपेज › Konkan › कोकणचा विकास शिवसेनेमुळेच

कोकणचा विकास शिवसेनेमुळेच

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 26 2018 10:04PMखेड : प्रतिनिधी

कोकणचा निसर्ग उद्ध्वस्त न करता देखील विकास साधता येऊ शकतो व तो शिवसेनाच करून दाखवू शकते, हे गेल्या अनेक वर्षांमध्ये दिसून आले आहे. यापुढे देखील आम्ही जगाला तो दाखवून देऊ, असा विश्‍वास राज्याचे पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्‍त केला. 

कोकणाच्या विकासाचा ध्यास घेऊन गेल्या कित्येक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेले ना.रामदास कदम यांनी नुकताच पर्यावरणाला घातक ठरलेल्या प्लास्टिक बंदीचा धाडसी निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडले. याबाबत त्यांना विरोधकांच्या कटू टीकेलादेखील सामोरे जावे लागले. परंतु, त्यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहात यापुढेदेखील अशाच प्रकारे कामांचा ओघ ठेवला जाईल, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

याबाबत भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले,  निसर्गामुळे माणूस आहे व तो जर नष्ट होणार असेल तर  अशा विकासात्मक प्रकल्पाला शिवसेना नेहमीच विरोध करेल. प्लास्टिक बंदीमुळे अनेकांनी पर्यावरणाचा विचार न करता उद्योगांचा व त्यातून मिळणार्‍या उत्पन्नाचा विचार केला. मात्र, शिवसेनेची भूमिका नेहमी पर्यावरणपूरक विकासाची राहिली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत शिवसेनेच्या माध्यमातून कोकणातील पर्यटनक्षेत्र, सरोवर विकासासाठी निधी खेचून आणण्यात यश मिळवले आहे.

मागील सरकारांनी कोकणावर केवळ प्रदूषणकारी प्रकल्प लादले. मात्र, येथील सिंचन प्रकल्पांना निधी दिला नाही. मात्र, शिवसेनेने रस्ते, नळपाणी योजना, पर्यटन विकास, सरोवर विकास आदींच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने विकासगंगा खेचून आणली आहे. यापुढे देखील पर्यावरणपूरक विकास काय असतो हे अशाच प्रकारच्या विकासात्मक कामांतून शिवसेना दाखवून देईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.