Sun, Jul 21, 2019 08:18होमपेज › Konkan › ‘हॅपी एग्ज’ ब्रॅण्ड विकसित करणार : ना. दीपक केसरकर

‘हॅपी एग्ज’ ब्रॅण्ड विकसित करणार : ना. दीपक केसरकर

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 11:06PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

बंदिस्त कोंबडी पालनामधून उत्पादित होणार्‍या अंड्यापेक्षा मोकळ्या वातावरणातील कोंबडी पालनातून उत्पादित होणारी अंडी अधिक पौष्टिक असतात. यासाठी ‘चांदा ते बांदा’ योजनेंतर्गत कुक्कुट ग्राम संकल्पनेतून महिला बचत गटांच्या सदस्यांना खुल्या कोंबडी पालनासाठी सहाय्य केले जाणार असून यामधून उत्पादित होणारी अंडी ‘हॅपी एग्ज’ ब्रॅण्डखाली विक्रीची व्यवस्था करण्यात येऊन ग्रामीण महिलांना रोजगाराची संधी निर्माण केली जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर आयोजित संजीवनी कृषी प्रदर्शन चर्चासत्रामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून पालकमंत्री ते बोलत होते. जि. प. सदस्य नागेंद्र परब, प्रकाश परब, जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी डॉ. सोनवणे उपस्थित होते.

ग्रामीण भागाचे अर्थकारण बदलण्याची सक्षमता चांदा ते बांदा या अभिनव योजनेत असल्याचे स्पष्ट करुन पालकमंत्री म्हणाले, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, कृषी यांत्रिकीकरण, मधुमक्षिका पालन व रेशीम उत्पादन, कृषी पर्यटन, खेकडा पालन, शोभिवंत मासे, कांदळवनातील खेकडा पालन, केज फिशिंग आदी योजनांद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे. यासाठी इच्छुकांनी आपली नावनोंदणी करावी व या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक उन्‍नती साधावी, असे आवाहन ना. केसरकर यांनी केले.   

या प्रदर्शनानिमित्त विविध विषयांवर चर्चासत्रे झाली व या चर्चासत्रामध्ये विषय तज्ज्ञांनी त्या विषयांची सविस्तर माहिती दिली. कृषी पर्यटनाबाबत चंदन भडसावळे, प्रथमेश सामंत, कुक्कुटपालन, शेळी पालनाबाबत डॉ. सोनवणे, पशुधन विकास अधिकारी डॉ. ढेकणे, बंदिस्त कुक्कुट पालनाबाबत दिनेश म्हाडगुत, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे प्रकल्प अधिकारी राजेश कांदळगावकर, समूह समन्वयक शंकर सावंत यांनी काथ्या उद्योगाबाबत माहिती दिली. शोभिवंत मासे उत्पादना बाबत डॉ. नितीन सावंत यांनी तर मत्स्य व्यवसायाबाबत अधिष्ठाता डॉ. हुकुमसिंग धाकड यांनी सविस्तर माहिती दिली. खादी ग्रामोद्योग अधिकारी  एस. ए. सावंत यांनी मधुमक्षिका पालन व रेशीम उद्योग तर डॉ. सुरेश नाईक यांनी खेकडा पालनाबाबत सविस्तर विवेचन केले. 

‘कुक्कुट ग्राम’ योजना

सिंधुदुर्ग जिल्ह्याला दररोज एक लक्ष दहा हजार अंड्यांची गरज आहे. हीच अंडी आपण आपल्या जिल्ह्यात कुक्कुटपालन व्यवसायाद्वारे निर्माण करु शकतो. यासाठीच ‘चांदा ते बांदा’ योजनेखाली बचतगटांच्या माध्यमातून कुक्कुट ग्राम ही योजना राबविण्यात येणार आहे.