होमपेज › Konkan › पुढील तीन वर्षात आंब्यासाठी प्रगत तंत्रज्ञान विकसित करणार : डॉ. तपस भट्टाचार्य

पुढील तीन वर्षात आंब्यासाठी प्रगत तंत्रज्ञान विकसित करणार : डॉ. तपस भट्टाचार्य

Published On: May 11 2018 1:38AM | Last Updated: May 10 2018 11:31PMवेंगुर्ले : प्रतिनिधी 

कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने गेल्या 44 वर्षात कोकणातील हापूस आंबा आणि त्याच्या विविध प्रजातींवर महत्वपूर्ण असे संशोधन केले आहे. जगभरात कोकणचा हापूस आंबा पोहचला, देश विदेशातून तज्ज्ञ इथे आले. मात्र जागतिक स्तरावर हापूस आंब्याची म्हणावी तशी प्रसिद्धी झालीच नाही. त्यामुळे विद्यापीठाने संशोधनातून केलेले कार्य जगासमोर यावे या उद्देशाने फक्‍त आंबा या फळावर वेंगुर्लेत पहिलीच आंतरराष्ट्रीय आंबा परिषद घेतली असून या परिषदेमुळे वेंगुर्ले हे शहर जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचले आहे. येत्या तीन वर्षात  संशोधन असेच सुरू ठेवून आंब्यावर नवीन प्रगत  तंत्रज्ञान विकसित करू, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी दिली. 

वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात आयोजित आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेदरम्यान कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सहयोगी संचालक डॉ. प्रदीप हळदवणेकर, डॉ. संजय भावे आदी उपस्थित होते.  डॉ. भट्टाचार्य म्हणाले, आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेमध्ये देशभरातून 314 तर जगभरातील सहा देशांमधून 12 शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. जगात स्पेन, चीन, अमेरिका, थायलंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत हे आंबा पीक उत्पादन घेणारे प्रमुख देश असून त्यांनी या परिषदेत सक्रिय सहभाग घेतला होता. जगाच्या आंबा उत्पादनामध्ये भारताची आंबा उत्पादन क्षमता मोठी आहे. जगाच्या अन्य देशांच्या तुलनेत भारत दरवर्षी 60 टक्के आंबा निर्यात करतो. भारतातील आंबा फळाबाबत काही समस्या आहेत. अन्य देशात कोणत्या तक्रारी आहेत यावर संशोधन करून उपाय शोधण्यासाठी ही परिषद घेण्यात आली आहे.

कोकणात पूर्वी 10 हजार हेक्टरवर असलेली आंबा लागवड आता  संशोधनामुळे 1 लाख 75 हजार हेक्टरपर्यंत पोहोचली आहे. देशात आंब्याच्या 20 हजार जाती आहेत. तर येथील फळ संशोधन केंद्राने 300 हून अधिक जाती विकसित केल्या आहेत. फक्‍त आंबा पिकावर गेली 44 वर्षे या केंद्रात अविरतपणे संशोधन सुरु असून त्याला यशही आले आहे. या परिषदेमध्ये कोकणातील हापूस आंबा, त्याची स्थिती आणि समस्या यावर विस्तृत चर्चा झाली आहे. केंद्राने केलेल्या संशोधनाची माहिती या परिषदेमुळे जगासमोर आली आहे असेही ते म्हणाले. परिषदेत कोकणातील आंबा फळावर झालेल्या संशोधनाचे ऑस्ट्रेलिया, चीन या देशातील शास्त्रज्ञांकडून कौतुक करण्यात आले.

जागतिक आंब्याची स्थिती, बदलते हवामान, कृषी तंत्रज्ञान, आंब्याची सुधारित जात, अनुवंशिकता, उत्पादन क्षमता, आंब्याचा इतिहास, आंबा पिकावर आधारित अर्थकारण याविषयी परिषदेत शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. येथे स्थानिक आंबा शेतकरी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे घराघरात आंबा फळावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरु झाले पाहिजे. तर तालुका पातळीवर त्यावर प्रोसेसिंग युनिट उभारून रोजगार निर्मिती केली जावी अशा सूचना या परिषदेतून शास्त्रज्ञांकडून आलेल्या आहेत. या आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेमुळे वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचा दर्जा वाढला असून लवकरच हे केंद्र आंब्यावर संशोधन करणारे राष्ट्रीय दर्जाचे केंद्र बनेल असा विश्‍वास कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी व्यक्‍त केला आहे.