Mon, Apr 22, 2019 06:32होमपेज › Konkan › कोकणातील देवस्थाने होणार कॅशलेस

कोकणातील देवस्थाने होणार कॅशलेस

Published On: Feb 15 2018 10:30PM | Last Updated: Feb 15 2018 10:16PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

कोकणातील गणपतीपुळे, हेदवी, पर्शुराम, कुणकेश्‍वर, आडीवरे आदी प्रसिद्ध देवस्थानांच्या कारभारात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाने ई-दानपेटीचा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याची तयारी केली आहे. क्यू आर कोड आणि मोबाईल बँकिंगसारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यामळे देवस्थानांच्या ठिकाणी ऑनलाईन सत्पात्री दानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यायाने खर्‍या अर्थाने ही देवस्थाने कॅशलेस होणार आहेत.

देशीसह परदेशी पर्यटकांबरोबर भाविकांची सर्वाधिक पंसती असलेल्या गणपतीपुळे देवस्थानाला प्रतिदिन हजारो भाविक भेट देत असतात. पर्यटन हंगामात दरवर्षी लाखो भाविक या मंदिरांना भेट देत असतात. येणारे भाविक मंदिर परिसरात असणार्‍या पेट्यांमध्ये आर्थिक दान करत असतात. तर काही भाविक मंदिराच्या देव्हार्‍यात ठेवलेल्या ताटात दक्षिणा ठेवत असतात. मात्र, काही देवस्थानांच्या दानपेट्यांमध्ये जमा होणार्‍या रकमेचा योग्य विनियोग होतो की नाही? यावरून वाद उत्पन्न होतात.

मंदिरातील दानपेट्यांचे व्यवहार पारदर्शकपणे व्हावेत यासाठी आता कोकणातील प्रशासनाच्या माध्यमातून ई-दानपेटी उपक्रम राबवण्यात येणार आहे.

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, धर्मादाय आयुक्‍त कार्यालय आणि प्रशासन यासह देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्‍तपणे हा उपक्रम राबवला जाणार आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर हा उपक्रम कार्यान्वित करण्यात येणार आहे.

या उपक्रमातून घरबसल्याही देणगी, दक्षिणा अभिषेक निधी देता येणार आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जे भाविक मंदिरात येऊ शकत नाहीत, त्यांनाही देवस्थानला घरबसल्या देणग्या देणे आता शक्य होणार आहे. सरकारच्या भीम अ‍ॅपद्वारे अथवा ‘यूपीआय’ अर्थात युनिफॉर्म पेमेंण्ट आधारित अ‍ॅपचा वापर करून हे दान करणे शक्य होणार आहे. यासाठी मंदिराच्या अधिकृत ‘क्यू आर कोड’चा वापर करून अथवा देवस्थानच्या अधिकृत बँक खात्याला संलग्न असणार्‍या मोबाईल नंबरचा वापर करून अथवा बँक खात्याचा क्रमांक वापरूनही हे दान करता येणार आहे.