Sun, Jun 16, 2019 12:37
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › कणकवलीत ‘स्वाभिमान’चा उपनगराध्यक्ष

कणकवलीत ‘स्वाभिमान’चा उपनगराध्यक्ष

Published On: May 06 2018 1:09AM | Last Updated: May 06 2018 12:37AMकणकवली : प्रतिनिधी

कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यपदी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक रवींद्र बाळकृष्ण गायकवाड यांची शनिवारी बिनविरोध निवड झाली, तर स्वीकृत नगरसेवकपदी स्वाभिमान पक्षाचे महेंद्र पुंडलिक सांबरेकर यांना तर शिवसेना-भाजप युतीतर्फे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांना संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे स्वीकृत नगरसेवकपदी निवड होऊनही निवडीच्या सभेला कन्हैया पारकर हे अनुपस्थित राहिले. पहिली अडीच वर्षे भाजपला तर नंतरची अडीच वर्षे सेनेला असा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला स्वीकृत नगरसेवकपदासाठी युतीने निश्‍चित केला आहे. 

कणकवलीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शनिवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या अध्यक्षतेखाली  न. पं. च्या परमहंस भालचंद्र महाराज सभागृहात उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडीची बैठक झाली. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपनगराध्यक्षपदासाठी स्वाभिमानचे नगरसेवक रवींद्र ऊर्फ बाबू गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. बंडू हर्णे यांनी त्यांना सूचक म्हणून तर कविता राणे यांनी गायकवाड यांना अनुमोदन दिले. एकमेव अर्ज आल्याने उपनगराध्यक्षपदी रवींद्र गायकवाड यांची बिनविरोध निवड झाल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जाहीर केले. रवींद्र गायकवाड यांच्या रूपाने मराठा फॅक्टरला न्याय देण्यात आला आहे.

रवींद्र गायकवाड हे कणकवली न. पं. च्या प्रभाग क्र. 17 मधून विजयी झाले आहेत. 2003 साली झालेल्या न. पं. च्या  पहिल्याच निवडणुकीत त्यावेळी शिवसेनेत असताना नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. आता पुन्हा 10 वर्षांच्या गॅपनंतर त्यांची न.पं.त एंट्री झाली असून स्वाभिमानचे अध्यक्ष खा. नारायण राणे यांनी त्यांना थेट उपनगराध्यक्षपदी संधी दिली आहे. कोणताही गाजावाजा न करता प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. नवनर्वाचित नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड आणि स्वीकृत नगरसेवकांचे सत्ताधारी आणि विरोधकांनीही अभिनंदन केले. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनीही सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले. 

नगराध्यक्षांसह स्वाभिमानचे सर्व नगरसेवक भगवे फेटे बांधून सभागृहात उपस्थित होते. फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी या निवडीचे स्वागत केले.सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. तरीही खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नवनिर्वाचीत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांना शहरातील अनेकांनी शुभेच्छा दिल्या. 

मुख्याधिकारी अवधूत तावडे, स्वाभिमानचे गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, अभि मुसळे,  विराज भोसले, अबिद नाईक, रविंद्र गायकवाड,  नगरसेविका सौ. सुप्रिया नलावडे, सौ. उर्मी कांबळे, सौ. प्रतिक्षा सावंत, सौ. कविता राणे, सौ. मेघा गांगण, शिवसेना-भाजप युतीचे गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक रूपेश नार्वेकर, सौ. सुमेधा अंधारी, सौ. मेघा सावंत, सौ. मानसी मुंज, सौ. माही परूळेकर उपस्थित होते. 

स्वच्छता आणि कणकवलीच्या विकासाला प्राधान्य : समीर नलावडे

नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना समीर नलावडे म्हणाले, खा. नारायण राणे व आ. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली न. पं. ची निवडणूक लढलो आणि जिंकलो. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कणकवली शहराला साजेसे असे काम आम्ही करणार आहोत. कणकवलीचा सर्वांगिण विकास हेच ध्येय ठेवून काम करताना प्रामुख्याने स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे.  कचरा, सांडपाणी व्यवस्था, पाणी नियोजन याचबरोबर शहरवासियांचे प्रश्‍न सर्व नगरसवेकांना सोबत घेऊन आपण सोडविणार आहे. 

राणेंचा विश्‍वास सार्थकी लावणार : रविंद्र गायकवाड

आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला खा. नारायण राणे व आ. नितेश राणे यांनी उपनगराध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी दिली आहे. त्यांनी टाकलेला विश्‍वास, त्यांना अपेक्षित असलेले शहर विकासाचे काम करून सार्थकी लावणार आहे. यापूर्वीही आपण नगरसेवक म्हणून काम केले असल्याने कणकवलीच्या प्रश्‍नांची चांगली जाण आहे. सर्वांना सोबत घेऊन कणकवली शहर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आदर्शवत बनवू, असा विश्‍वास कणकवलीचे नवनिर्वाचीत उपनगराध्यक्ष रविंद्र गायकवाड यांनी व्यक्त केला.