Mon, Jun 17, 2019 05:08होमपेज › Konkan › भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटेना अटक करा

भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटेना अटक करा

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 13 2018 11:58PM

बुकमार्क करा

सावंतवाडी : प्रतिनिधी 

कोपर्डी हत्याकांडात आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचविणार्‍या गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आपले साधे अभिनंदनही करण्यात आले नसल्याची खंत व्यक्‍त केली होती. मात्र,भीमा - कोरेगाव प्रकरणामध्ये हात असलेले भिडे गुरुजी व मिलिंद एकबोटे यांना ना. केसरकर यांना  त्यांनी अटक करावी, म्हणजे त्यांचे अभिनंदन आणि सत्कार बहुजन समाज राज्यात ठिकठिकाणी करेल, असा आवाहन जि. प. सदस्य अंकुश जाधव यांनी पालकमंत्र्यांना केले.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ निषेध कृती समितीच्या निषेध मोर्चाला ते संबोधन करीत होेते. हा मोर्चा समाज मंदिर येथून सावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. त्या नंतर या मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये झाले. मोर्चामध्ये  माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जनता दल जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, कायदेविषयक सल्‍लागार अ‍ॅड. अनिल निरवडेकर, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्‍ते डॉ. जयेंद्र परुळेकर, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, अ‍ॅड. संदीप निंबाळकर, व्यापारी संघाचे पदाधिकारी बाळासाहेब बोर्डेकर, प्रसाद पावसकर, सावंतवाडी अर्बन बँकेचे संचालक रमेश बोंद्रे, जिल्हा चर्मकर उन्नती मंडळाचे पदाधिकारी विजय चव्हाण, जिल्हा सरचिटणीस पी. बी. चव्हाण, संजय गवस, मोहन जाधव, गोव्याचे निखिल प्राजक्ते, सुदीप कांबळे, संदीप कदम,ओटवणे ग्रा. पं. सदस्य गुंडू जाधव, कृती समितीचे संयोजक वासुदेव जाधव, सत्यवान जाधव, भावना कदम, जिकर मेनन, व्ही. आर. आसोलकर, ॠषाली जाधव आदी सहभागी झाले 
होते.

या मोर्चात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक  संघटना एकत्र आल्या होत्या. या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात दंगल नियंत्रक पथकासहीत पोलिस तैनात करण्यात आले होते.  निषेध मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन झाली. यानंतर हजारोच्या संख्येने नागरिक प्रांत कार्यालयावर धडकले. मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजी यांना  अटक करा, अशा जोरदार घोषणा  देण्यात आल्या.

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले, भाजपा व सेना सरकारने भीमा- कोरेगाव येथील शहीददिन कार्यक्रमाला पुरेसे पोलिस संरक्षण  दिले नाही. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली.  राष्ट्रवादी काँग्रेस भीमशक्‍तीच्या मागे कायम राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली. महेश परुळेकर म्हणाले, पालकमंत्री केसरकर यांच्याकडून भिडे व एकबोटे यांचे समर्थन होणे हे निषेधार्थ आहे.  
  डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी राष्ट्रीय स्वयंसंघ हा देशद्रोही असल्याचा आरोप केला. निखिल प्राजक्‍ते  म्हणाले, आपण भीमा कोरेगाव प्रकरणाचा  साक्षीदार आहे. गोवा बहुजन समाजाच्यावतीने 1 जानेवारीला आपण 

घटनास्थळी होतो. ही घटना अमानुष असून   ब्राम्हणशाही मोडीत काढण्यासाठी बहुजन समाजाने जागृत व्हा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. विजयालक्षमी चिंडक, अ‍ॅड. संदीप निंबाळकर, संदीप कदम यांनीही मार्गदर्शनन केले. कृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना निवेदन सादर करण्यात आले.  नायब तहसीलदार शशिकांत जाधव, पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव आदिंसह प्रमुख पोलीस व महसुल अधिकारी उपस्थित होते.