Tue, Jul 07, 2020 07:35होमपेज › Konkan › जिल्ह्यातील पत्रकारांचा 10 जूनपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

जिल्ह्यातील पत्रकारांचा 10 जूनपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

Published On: Jun 06 2019 1:35AM | Last Updated: Jun 05 2019 11:46PM
खेड : प्रतिनिधी

पत्रकारांवर भ्याड हल्‍ला करणार्‍या मटका, जुगार अड्डेवाल्यांविरोधात संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकार एकवटले आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी बैठका सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व पत्रकार दि. 10 जून रोजी खेड पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण छेडणार आहेत.

या बाबतचे पत्र पोलिस निरीक्षकांसह, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, पर्यावरणमंत्री, जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, प्रांताधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले आहे. दि. 10 जूनचे उपोषण आणि त्यापुढे ठरवायची दिशा याबाबतची बैठकही लवकरच खेडमध्ये होणार आहे.

सोमवार दि. 3 जून रोजी भरणे येथील जुगार अड्ड्यांच्या विरोधात अशी बातमी आल्यानंतर त्याच दिवशी सकाळी 11.30 वा. भरणे येथील मटका जुगार व्यावसायिक व मुख्य सूत्रधार दिनकर उर्फ बारक्या लोहार याचे हस्तक अजय चव्हाण, प्रभाकर लोहार, माणिक लोहार आणि अन्य तिघे-चौघे बेकायदा जमाव करीत जबदरस्तीने कार्यालयात घुसले आणि तालुक्यातील सर्व माध्यम प्रतिनिधींना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. केवळ  एवढ्यावरच ते न थांबता दुपारी 12.37 वाजता अजय चव्हाण याने आपल्या भ्रमणध्वनीवरुन सदानंद जंगम यांना फोन करुन शिवीगाळ केली. या बाबतच्या तक्रारी सदानंद जंगम, दिवाकर प्रभु यांनी पोलिस स्थानकात त्याच दिवशी दुपारी दाखल केली. याच दिवशी रात्री 8.40 वाजता खेड बाजारपेठेत अनुज जोशी, सिध्देश परशेट्ये या दोन पत्रकारांना मारहाण झाली.

दिनांक 4 जून रोजी खेड, दापोली, मंडणगड येथील पत्रकारांनी पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदनाद्वारे भरणेनाका येथील मटका व्यावसायिकास मोक्‍का लावावा व त्यांना तडीपार करावे, अशी मागणी केली आहे. याबाबतची ठोस कारवाई न झाल्यास येत्या 10 जून रोजी खेड पोलिस ठाण्याच्या आवारात जिल्ह्यातील सर्व पत्रकार बेमुदत उपोषण छेडतील असा इशारा दिला आहे.