Wed, Apr 24, 2019 11:41होमपेज › Konkan › मुख्याधिकार्‍यांविरोधात सदोष मनुष्यवधाची तक्रार द्या : शहर सुधार समितीची मागणी

मुख्याधिकार्‍यांविरोधात सदोष मनुष्यवधाची तक्रार द्या : शहर सुधार समितीची मागणी

Published On: May 31 2018 1:39AM | Last Updated: May 30 2018 11:53PMचिपळूण : शहर वार्ताहर

चिपळूण न. प.तील सत्ताधार्‍यांनी येत्या दोन दिवसांत मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाची तक्रार दाखल करावी, अशी मागणी शहर सुधार समितीच्या वतीने बुधवारी करण्यात आली. याचवेळी समितीचे सदस्य शिवसेना शहरप्रमुख राजू देवळेकर यांनी मुख्याधिकारी चिपळूणच्या हद्दीत दिसल्यास त्यांना अद्दल घडवू, असा इशाराही दिला आहे.

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेला शहर सुधार समितीचे राजू जाधव, माजी उपनगराध्यक्ष महंमद फकीर, बरकत वांगडे, रामदास सावंत, संदीप लवेकर आदी उपस्थित होते. पत्रकारांना माहिती देताना समितीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक शिरीष काटकर यांनी सांगितले की, चिपळूणच्या इतिहासात एका युवकाचा न.प.च्या बेपर्वाईमुळे बळी जाणे ही दुर्दैवी घटना आहे. याची जबाबदारी म्हणून नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा. मुख्याधिकारी व सत्ताधार्‍यांच्या नाकर्तेपणाचा हा बळी आहे. या घटनेला दोन दिवस उलटले. तरीदेखील सत्ताधार्‍यांनी मुख्याधिकार्‍यांचा निषेधही केला नाही. मुख्याधिकार्‍यांनी चिपळूणची न.प. आर्थिकदृष्ट्या पोखरुन काढली आहे. त्यांच्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे सत्ताधारी गटातील तिन्ही पक्ष त्यांच्यापुढे लाचार झाले आहेत. सत्ताधार्‍यांच्या माध्यमातून मुख्याधिकार्‍यांनी भुयारी गटार, एलईडी, बाजार पूल, ‘रेरा’ कायद्याच्या माध्यमातून गैरव्यवहार करीत शहराची करोडो रुपयांची लूट केली आहे. मुख्याधिकारी कामचुकार आहेत. ते केवळ पैसे खाण्यासाठीच न.प.त येतात. या मुख्याधिकार्‍यांविरोधात येत्या दोन दिवसांत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न झाल्यास शहर सुधार समिती याबाबत गांभीर्याने लक्ष घालेल. 
शिवसेना शहरप्रमुख राजू देवळेकर म्हणाले, घटना घडल्यानंतर मी स्वत: पोलिसांकडे नगराध्यक्षा व मुख्याधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या दोघांनाही खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही.

जनआंदोलन उभारू
मुख्याधिकारी पाटील हे जर जनतेच्या भावना ओळखून न.प.त आले असते तर त्या युवकाचा मृतदेह न.प.त आणला गेला नसता. मात्र, त्यांचा निषेध करण्यासाठी व जमावाच्या संतप्त भावना व्यक्त करण्यासाठीच युवकाचा मृतदेह न.प.त आणला गेला. येत्या दोन दिवसांत अशा बेजबाबदार मुख्याधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करुन कारवाई न झाल्यास जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा आरपीआय (आठवले)चे राजू जाधव यांनी दिला आहे.