Tue, Nov 13, 2018 10:36होमपेज › Konkan › पाचलमध्ये आधार केंद्राची मागणी

पाचलमध्ये आधार केंद्राची मागणी

Published On: Jan 09 2018 1:34AM | Last Updated: Jan 08 2018 8:36PM

बुकमार्क करा
येळवण : वार्ताहर

पाचल परिसरातील अनेक लोकांचे आधारकार्ड अपडेट करायचे असून त्यासाठी येथील लोकांना रत्नागिरी किंवा राजापूरला जावे लागत आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे सर्व जनतेची सोय जवळच व्हावी म्हणून पाचल पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्ड नोंदणी व दुरुस्तीचे अधिकृत केंद्र सुरु करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. 

सध्या बँक, पोस्ट, बचत खाते, विमा पॉलिसी, मोबाईल नंबरसाठी आधारकार्ड लिंक करावे लागत आहे. मात्र, अनेकांची आधार कार्ड लिंकच होत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना रत्नागिरी, राजापूर किंवा कोल्हापूरला जाऊन आधारकार्ड अपडेट करुन घ्यावे लागत आहे. त्याचा मानसिक व आर्थिक भुर्दंड सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. त्यामुळे सुमारे पाचल परिसरातील सुमारे 50 गावांना सोयीचे असलेल्या पाचल पोस्टामध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ही सुविधा पाचल पोस्टामध्ये सुरु झाल्यास लोकांचा वेळ व पैसाही वाचू शकतो. 

पाचलमध्ये काही खासगी लोकांच्या मार्फत ही सुविधा दिली जात आहे. मात्र, लोकांकडून त्याचा मोबदला म्हणून बक्कळ पैसे उकळले जात असल्याने अनेक ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 
पाचलमध्ये सध्या 25 रुपयांच्या कामासाठी 300 ते 500 रुपये उकळले जात आहेत. पाचल परिसरातील लोकांची होणारी ही लूट थांबविण्यासाठी शासनाने पाचल पोस्टामध्ये ही सुविधा निर्माण करुन द्यावी, अशी मागणी केली जात आहे.