Sun, Mar 24, 2019 16:49होमपेज › Konkan › ... अन्यथा सोमवारपासून रास्त धान्य दुकाने बंद ठेवू

... अन्यथा सोमवारपासून रास्त धान्य दुकाने बंद ठेवू

Published On: May 19 2018 10:55PM | Last Updated: May 19 2018 10:01PMसावंतवाडी : प्रतिनिधी 

धान्य वितरणासाठी ऑनलाईन इंटरनेट सुविधा द्या,थकित मानधन तत्काळ द्या. जोपर्यत ऑनलाईन सुविधा सुरळीत होत नाही तोपर्यत ऑफलाईन धान्य वितरण प्रणालीला मान्यता द्या. येत्या दोन दिवसात जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी लक्ष न दिल्यास  सोमवारपासून तालुक्यातील सर्व धान्य दुकाने बंद ठेवू, असा इशारा शुक्रवारी आयोजित रास्त धान्य दुकान संघटनेच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती तालुक्यातील रेशन दुकानदारांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्याचा विचार करता बराचसा भाग डोंगराळ आहे. बहुतांशी गावात इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे नव्याने सुरू करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमुळे रेशन दुकानांवर टीडीएस मशीन चालविणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे लोकांना त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी या प्रक्रियेबाबत प्रशासनाने योग्य तो पाठपुरावा करावा व ऑफलाईन ला परवानगी द्या, अशी मागणी   बैठकीत करण्यात आली

त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष रुपेश राऊळ यांनी ही माहिती दिली.  गणपत राणे, संजय मुळीक,  प्रकाश बांदेकर, सुधाकर देसाई, रवी परब आदी उपस्थित होते. राऊळ म्हणाले, जिल्हा डोंगराळ भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑनलाईनची यंत्रणा सुरळीत राहणे किंवा त्या माध्यमातून लोकांना चांगली सेवा देणे शक्य होत नाही.  बर्‍याच गावात रेंज समस्या असल्यामुळे अर्धा-अर्धा तास कनेक्टिव्हिटी मिळत नाही. त्यामुळे हाताचे ठसे घेताना अनेक समस्या निर्माण होतात. यावर योग्य ती उपाययोजना राबविण्यात यावी. त्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांची भेट घेऊन आम्ही मागणी केली. यात येत्या दोन दिवसांत नेमकी पर्यायी व्यवस्था करा अन्यथा सोमवारपासून धान्य दुकाने बंद करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.