Tue, May 21, 2019 18:54होमपेज › Konkan › रत्‍नागिरी : सुडाच्या राजकारणासाठी बदनामी

रत्‍नागिरी : सुडाच्या राजकारणासाठी बदनामी

Published On: May 03 2018 11:22PM | Last Updated: May 03 2018 11:05PMचिपळूण : शहर वार्ताहर

सत्ताधारी गटातील दुकानदारी मांडलेल्या काही नगरसेवकांना हाताशी धरून विरोधकांनी माझ्याविरोधात सुडाचे राजकारण करण्याचे षड्यंत्र रचल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी बुधवारी दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्‍त केली.

गैरव्यवहाराच्या आरोपात भाजपच्या नगराध्यक्षांना लक्ष्य केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर नगराध्यक्षा खेराडे म्हणाल्या, विरोधक हे त्यांचे काम करतच राहणार मात्र, विरोधकच सत्तेतील काही दुकानदारी मांडलेल्या नगरसेवकांना हाताशी धरून माझ्याविरोधात सुडाचे राजकारण करीत आहेत. नगरसेवकांसोबत प्रशासनातील काही अधिकार्‍यांनाही त्यांनी हाताशी धरले आहे. एकीकडे विकासकामे होत नाहीत म्हणून ओरड करायची, दुसरीकडे चुकीच्या पद्धतीने गैरव्यवहाराला जागा मिळेल अशा कामांचे नियोजन करायचे ही पद्धत सध्या सुरू झाली आहे.

पागमळा येथील एका 380 मी. लांबीच्या रस्त्याकरिता दीड कोटी रूपयांचे अंदाजपत्रक तयार करून घेतले. हे अंदाजपत्रक प्रशासनाला हाताशी धरून करताना राष्ट्रीय महामार्गाचे निकष लावले गेले. केवळ 380 मी. लांबीच्या रस्त्याला दीड कोटी रूपये खर्चाचे अंदाजपत्रक का केले? कोणी केले आणि कसे केले? याचा शोध घेऊन त्यांना आरोप करणार्‍यांनी जनतेसमोर आणावे. त्याचप्रमाणे न. प. प्रशासनाच्या बांधकाम विभागातील अभियंत्यांनी शहरातील संपूर्ण अंतर्गत रस्ते करण्यासाठी बारा कोटी रूपये खर्चाचे अंदाजपत्रक केले होते. यामध्येदेखील काहींनी हस्तक्षेप केल्याचा अंदाज आला. त्यामुळे पॅनेलवरील एका आर्किटेक्टकडून याच रस्त्याचे अंदाजपत्रक नव्याने करण्यात आले. त्याचा खर्च सुमारे सात कोटीवर आणला. वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा करण्यासाठी गरज नसतानाही निविदा काढण्यासाठी दबावाचे राजकारण करण्यात आले. वस्तूत: नदीतील गाळ उपसा  शासनाकडून केला जातो. त्यामुळे न.प.चा खर्च वाचतो. परंतु निविदा काढून रॉयल्टी व गाळ उपशाचा खर्च न.प.च्या माथी मारण्याचे कारस्थान काहींच्या अट्टाहासामुळे झाले. याच निविदेतील 1 ते 19 अटी-शर्तींमधील अत्यंत तीन महत्त्वाच्या अटी ज्यांना यात इंटरेस्ट होता त्यांनी प्रशासनाला हाताशी धरून परस्पर काढल्या. त्यामध्ये वाहनांची कागदपत्रे नसली तरी चालतील, शासनाचे व आरटीओचे टॅक्स भरले नसले तरी चालतील या महत्त्वाच्या अटी परस्पर प्रशासनाला हाताशी धरून वगळण्याचे कारस्थान कुणी केले? असा सवालही त्यांनी 
केला. 

वाशिष्ठी नदीकिनार्‍यावर 800 कोटी रूपये खर्च करून संरक्षक बंधारा बांधण्याचा अट्टाहास देखील झाला. बंधारा बांधण्याच्या ‘डीपीआर’साठी एका बोगस संस्थेला काम देण्याचा घाट घातला गेला. जी संस्था वह्या वाटप, शिबिरे घेण्याची कामे करते त्या संस्थेला हे तांत्रिक काम देण्याचा डाव माझ्यासह सभागृहाने उधळून लावला. अशा पद्धतीने मनामानी कामे करून घेण्याचे रचलेले षड्यंत्र वारंवार उधळून लावत असल्याने माझ्याविरोधात बदनामी व सुडाचे राजकारण सुरू आहे, अशा भावना नगराध्यक्षा खेराडे यांनी  व्यक्‍त केल्या.