Thu, Jun 27, 2019 16:26होमपेज › Konkan › कोकण पदवीधर मतदारसंघात २० हजार मतदारांची घट 

कोकण पदवीधर मतदारसंघात २० हजार मतदारांची घट 

Published On: May 06 2018 1:09AM | Last Updated: May 06 2018 12:01AMरामपूर : वार्ताहर

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक रंगात आली असताना आता कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूकदेखील तोंडावर आली आहे. ही निवडणूक येत्या 30 जून रोजी होणार आहे. मात्र, या वेळी पदवीधर मतदारांमध्ये तब्बल 20 हजारांनी  घट झाली आहे.

विविध राजकीय पक्षांनी या पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणी मोहिमेवर भर दिला होता. मात्र, याला फारसा प्रतिसाद लाभला नसल्याचे स्पषट झाले आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मतदार नोंदणीसाठी मोठी मोहीम राबविली होती. परंतु, मतदारांमध्ये फारशी वाढ झाली नाही. उलट गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी 20 हजार मतदार घटले आहेत. पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे कोकण पदवीधर मतदारसंघात येतात. सन 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात 1 लख 9 हजार मतदार नोंदणी झाली होती. आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आता पर्यत 90 हजार 252 इतकी मतदार नोंदणी झाली आहे. त्यामुळे सुमारे 20 हजारांनी पदवीधर मतदार संख्या घटली आहे. पदवीधर मतदारांमध्ये असलेला मतदानाविषयी निरुत्साह या माध्यमातून स्पष्ट झाला आहे.  सन 1988 मध्ये कोकण पदवीधर मतदारसंघ अस्तित्वात आला. 

यावेळी केवळ सहा हजार मतदार नोंदणी झाली होती. त्यावेळी ठाणे येथील भाजपचे उमेदवार वसंत पटवर्धन विजयी झाले होते. 1994 साली या मतदारसंघात 12 हजार मतदार नोंदणी झाली. मतदार दुप्पट वाढले. त्यावेळी डॉ. अशोक मोडक आमदार म्हणून निवडून आले. सन 2006 साली तब्बल 66 हजार मतदार नोंदणी झाली. त्यावेळी भाजपचे संजय केळकर यांनी राष्ट्रवादीचे नीलेश चव्हाण यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव केला होता तर 2012 मध्ये पदवीधर मतदार वाढले त्यासाठी राष्ट्रवादीने जोर लावला आणि मतदार संख्या 1 लाख 9 हजारांवर गेली. यावेळी राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांना 27,633 तर भाजपचे संजय केळकर यांना 22 हजार 92 मते मिळाली आणि डावखरे 5641 मतांनी विजयी झाले. पारंपरिक भाजपकडे असलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचून आणला. आता जून 2018 मध्ये याच मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यामुळे सत्तेत असलेली भाजप पुन्हा एकदा हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे डावखरे यांच्या समोर आव्हान उभे आहे.

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील पालघर जिल्ह्यात 15135, ठाणे जिल्ह्यात 37,254, रायगड जिल्ह्यात 24,158, रत्नागिरी जिल्ह्यात 15,507, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4587 पदवीधर मतदार नोंदणी झाली आहे. ही निवडणूक 30 जून रोजी होणार असून निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे. 

मतदारसंघात 94 मतदान केंद्रे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात तालुकानिहाय खालीलप्रमाणे पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये मंडणगड मध्ये 356, दापोली 1433, खेड 1812, चिपळूण 3320, गुहागर 964, संगमेश्वर 1541 ,रत्नागिरी 4236, लांजा 485, राजापूर949 इतकी मतदार नोंदणी झाली आहे. 

भाजप पुन्हा ताकद लावणार

कोकण पदवीधर मतदारसंघात ही निवडणूक चुरशीची होणार आहे. राष्ट्रवादीतर्फे निरंजन डावखरे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. भाजपतर्फे मिलींद पाटणकर, डॉ. राजेश मढवी, डॉ. विनय नातू, संदीप लेले, नीलेश चव्हाण ही नावे आहेत. शिवसेनेकडून माजी महापौर संजय मोरे, वरूण देसाई, नरेश म्हस्के यांची नावे चर्चेत आहेत. हातातून गेलेला मतदारसंघ पुन्हा  मिळविण्यासाठी  भाजप ताकद लावणार आहे.