Mon, Aug 19, 2019 09:05होमपेज › Konkan › अधिकार्‍यांच्या अकार्यक्षमतेमुळे लॅण्डलाईन ग्राहकांच्या संख्येत घट!

अधिकार्‍यांच्या अकार्यक्षमतेमुळे लॅण्डलाईन ग्राहकांच्या संख्येत घट!

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 16 2018 10:55PMसावंतवाडी : प्रतिनिधी

दूरसंचार सल्‍लागार समिती बैठकीमध्ये कंपनीच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांच्या अकार्यक्षमतेबद्दल समिती सदस्या सौ. दीपलक्ष्मी पडते यांनी थेट निशाणा साधला. गेल्या दोन वर्षांपासून लॅण्डलाईन टेलिफोनसाठी जोडण्यात येणार्‍या केबल निकृष्ट दर्जाच्या असल्याने ग्राहकांना सुरळीत सेवा मिळत नाही. याच कारणामुळे त्रस्त ग्राहक लॅण्डलाईन सेवेकडे पाठ फिरवत असून दूरसंचारच्या लॅण्डलाईन टेलिफोन संख्येत झपाट्याने घट होत असाल्याचा दावा त्यांनी केला.

यावेळी  मालवण  नगरपरिषदेला बीएसएनएलकडून स्वच्छतेबाबत मशिन देण्यात आली असल्याची माहिती  सहाय्यक महाप्रबंधक सौ. अनघा भोसले यांनी दिली. यावर सौ. पडते यांनी बीएसएनएलचा फोन अथवा मोबाईल लागत नसेल तर त्या तक्रारीची तत्काळ दखल घेणारे मशिन तयार करा, स्वच्छता होत नसेल तर नगरपरिषदेला जबाबदार धरता येते. परंतु, तक्रार करुनही दुर्लक्ष करणार्‍या बीएसएनएलच्या अधिकार्‍यांकडून दखल घेण्याची मानसिकता नाही,असा उपरोधिक सल्ला दिला.

महाप्रबंधक संजीवकुमार चौधरी यांनी टॉवर नादुरुस्त झाल्यास त्याचा एसएमएस संबंधित दुरुस्ती विभागाला जाणार असून त्या टॉवरची तत्काळ दुरुस्ती करणारी यंत्रणा कार्यान्वित झाल्याचे सांगितले. ही यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे आदेश त्यांनी दिले. 

मार्चपासून मोबाईल टॉवर खराब झाल्यास त्याची सूचना संबंधितांना मिळणार असून तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना खा. राऊत यांनी  दिल्या. यापूर्वीचे 188  व आता मंजूर झालेले 104 आणि फोरजीचे 27 मोबाईल टॉवर कार्यान्वित झाल्यानंतर सिंधुदुर्गवासीयांना दुरसंचारची चांगली सेवा मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याने सर्वाधिक 36 हजार मोबाईल सीमकार्ड विक्री करुन प्रथम क्रमांक मिळविला असून नव्याने टॉवर कार्यान्वित झाल्यानंतर या ग्राहकांना चांगली सेवा मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. मोबाईल टॉवर उभारणीची जबाबदारी महाप्रबंधक सुहास कांबळे यांच्याकडे   देण्यात आली असून त्यांनी बीटीएस या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे 150 अतिरिक्‍त मोबाईल टॉवर खा. विनायक राऊत यांच्या प्रयत्नाने मिळाले असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. 

सावंतवाडी तालुक्यातील 25 गावे नोपा कनेक्शनसाठी मागे कशी राहिली, असा सवाल सदस्य रुपेश राऊळ यांनी केला. ओएफसीचे काम करणार्‍या कंत्राटदाराकडून म्हापण येथे दादागिरी केली जात असल्याची तक्रार राऊळ यांनी केली. नेमळे येथे रस्त्याच्या दुसर्‍या बाजूने बीएसएनएलची केबल का टाकली नाही असा सवाल बैठकीत  केला. यावर बांद्यात काम करु दिले जात नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. मोर्ले - पारगड केबल  कामाची माहिती देण्याच्या सूचना खा. राऊत यांनी  केल्या.