Tue, Jul 23, 2019 19:13होमपेज › Konkan › शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा आकृतीबंध घोषित करा

शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा आकृतीबंध घोषित करा

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 24 2018 9:03PMसावंतवाडी : प्रतिनिधी

राज्यात माध्यमिक शाळांतील लिपीक, शिपाई, प्रयोगशाळा सहाय्यकपदे मोठ्या प्रमाणात रिक्‍त आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामे ठप्प आहेत. शिक्षणसेवक पदांना मान्यता मिळालेल्या नाहीत. त्यामुळे अनेक समस्या  निर्माण होत आहेत. शिक्षक, संस्थाचालक यांना शैक्षणिक गुणवत्तेसाठी शासनाची गरज भासते. यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन कर्मचार्‍यांचा आकृतीबंध घोषित करावा, अशी मागणी नागपूर विभागाचे शिक्षक आ. ना. गो. गाणार यांनी केली. 

सिंधुदुर्गनगरी येथे शिक्षणाधिकारी कार्यालयात राज्य शिक्षक परिषदेच्या सहविचार सभेला ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांच्याशी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांविषयी चर्चा केली. शासन निर्णयानुसार प्रलंबित प्रश्‍न चार आठवड्याच्या आत निकाली काढणे आवश्यक आहे. शासन निर्णय त्वरित मुख्याध्यापकांना त्वरित कळविणे बंधनकारक आहे. वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, नियुक्‍ती, न्यायालयीन प्रकरणे, पदोन्‍नती अशी 64 प्रकरणे प्रलंबित आहेत. नियमांना अधीन राहून मान्यता देणे या सर्व बाबींची शासनस्तरावर शिक्षणाधिकारी यांनी त्वरीत अंमलबजावणी करावी, असे लेखी आदेश शिक्षक आ. ना. गो. गाणार यांनी शिक्षणाधिकार्‍यांना  दिले. 

न्यायालयाचा आदेश असूनही काही शिक्षकांना हजर करुन घेतले जात नाही. संच निर्धारित करताना सेवा ज्येष्ठता यादी चुकीची दाखवून समायोजन करताना ज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय झाला आहे. त्याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. कोणत्याही कर्मचार्‍यांचे प्रश्‍न प्रलंबित ठेऊ नये. पेन्शन सर्वांना मिळायला हवी. त्यांचा तो हक्‍क आहे. अनुकंपाखालील प्रकरणे मंजूर करावीत. काही शाळांतून दहा - दहा वर्षे विनावेतन कर्मचारी काम करीत आहेत. 

भरती बंदीचे कारण सांगून मान्यता मिळत नाहीत. शासनस्तरावर याचा गांभिर्याने विचार होत नाही. शिक्षण क्षेत्रातील ही दुरवस्था घातक आहे. शासनाने याकडे त्वरित लक्ष घालून धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करावी, अंशदायी पेन्शन योजनेचा फेरविचार व्हावा. जे काम करताना त्यांना पेन्शन मिळणार तो त्यांचा अधिकारच आहे.  असे विचार आ.  गाणार यांनी सहविचार सभेत मांडले. संघटनेचे  राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू, जिल्हाध्यक्ष राजेंद्र माणगावकर, सचिव सलिम तकिलदार, वाय.पी. नाईक, डी. एस. ढगे, एस. के.राठोड, नंदन घोगळे, येडगे भीमराव, भरत केसरकर, एस.पी. कुलकर्णी, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी सुनील मंद्रुपकर,   व कर्मचारी उपस्थित होते. आ. ना. गो.गाणार यांचा सत्कार राजेंद्र माणगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. आभार सलिम तकिलदार यांनी मानले.