होमपेज › Konkan › रिक्षात बसताच मोजावे लागणार २७ रुपये 

रिक्षात बसताच मोजावे लागणार २७ रुपये 

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 05 2018 8:27PMरत्नागिरी : प्रतिनिधी

सातत्याने वाढणारे पेट्रोल, ऑईलचे दर, पार्ट्सच्या वाढत्या किमती यामुळे हैराण झालेले रिक्षा व्यावसायिक गेल्या पाच वर्षांपासून भाडेवाढीसाठी प्रयत्न करीत होते. या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. पाच वर्षांनंतर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रिक्षा भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. यामुळे रिक्षा व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. ही अंमलबजावणी दि. 7 सप्टेंबरपासून अमलात आणायची आहे.

रिक्षा भाडेवाढ सन 2013 मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी पहिल्या 1.6 मीटरच्या टप्प्याला 20 रुपये तर पुढील किलोमीटरला 13 रुपये  भाववाढ देण्यात आली आहे. नवीन दरवाढीनुसार पहिल्या 1.6 कि.मी.ला 27 रुपये तर पुढील प्रत्येक टप्प्यासाठी 17 रुपये दरवाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर वाढले तरीही आरटीओने दरवाढ न केल्यामुळे हैराण झालेल्या रिक्षा व्यावसायिकांनी काही ठिकाणी स्वत:च दरवाढ केली होती. मात्र, नवीन दरवाढीमुळे रिक्षा व्यावसायिकांनी  समाधान व्यक्‍त केले. 

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रलंबित असलेल्या रिक्षा भाडे निश्‍चितीचा निर्णय घेतला. या निर्णयाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणचे सदस्य जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने 4 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत रिक्षा भाडे निश्‍चितीच्या निर्णयास मान्यता देण्यात आली. 

जिल्ह्यात एल.पी.जी. इंधनावर चालणार्‍या रिक्षाचे प्रमाण पेट्रोलवर चालणार्‍या रिक्षांपेक्षा तुलनेने फार कमी आहे. त्यामुळे भाडेदर  निश्‍चित करताना पेट्रोल या इंधनाचे मूल्य विचारात घेण्यात आले आहे. तसेच ऑटो रिक्षासाठी भाडेदराची परिगणना व्याज व घसारा, विमा व कर, दुरुस्ती व देखभाल खर्च, राहणीमानाचा दर्जा व इंधन खर्च हे घटक विचारात घेऊन करण्यात आली आहे. ही दर वाढ सुमारे पाच वर्षांनंतर करण्यात आली असल्याने रिक्षा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आता रिक्षाचालक याची अंमलबजावणी करणार असल्याने प्रवाशांना अधिकृत मीटरप्रमाणे भाडे द्यावे लागणार आहे. त्यामुळे 20 च्या ऐवजी 40 रूपये अनधिकृतरित्या आकारणार्‍या रिक्षा चालकांना चाप बसणार आहे. त्याशिवाय प्रवाशांशी हुज्जत घालण्याचे जे प्रकार घडत होते, त्यावरही आळा बसणार आहे.

मीटरप्रमाणे भाडे न आकारणार्‍यांविरोधात तक्रार करा

जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालक व मालक यांनी आपल्या रिक्षाच्या मीटरमध्ये 7 सप्टेंबरपासून सुधारित भाडेनिश्‍चिती करावी. तसेच मीटरप्रमाणे भाडे न आकारणे व भाडे नाकारणे अशा रिक्षा चालकांविरोधात टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 02352-229444 या क्रमांकावर वाहन क्रमांकासह तक्रार नोंदवावी, पोस्ट कार्डद्वारेही तक्रारी स्वीकारण्यात येतील, याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांनी आवाहन केले आहे.