Mon, Mar 25, 2019 17:57होमपेज › Konkan › ‘धूतपापेश्‍वर’च्या विश्‍वस्ताला हटवले

‘धूतपापेश्‍वर’च्या विश्‍वस्ताला हटवले

Published On: Aug 21 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 9:03PMराजापूर : प्रतिनिधी

येथील श्री धूतपापेश्‍वर मंदिराच्या विश्‍वस्त पदावरून श्रीकृष्ण वासुदेव पळसुलेदेसाई यांना दूर करण्यात येत असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी नुकताच दिला आहे. पुढील विश्‍वस्त मंडळ स्थापन होईपर्यंत रत्नागिरीचे धर्मादाय आयुक्‍त अजित थोरात यांच्या वतीने मंदिराचा कारभार पाहिला जाणार आहे. याबाबतची माहिती धोपेश्‍वरमधील वासुदेव करंबेळकर व ग्रामस्थांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

राजापूरपासून जवळच असलेल्या श्री धूतपापेश्‍वर मंदिराचे विश्‍वस्त श्रीकृष्ण पळसुलेदेसाई यांच्या आर्थिक कारभाराविरुद्ध धोपेश्‍वरमधील ग्रामस्थ वासुदेव करंबेळकर यांनी कोल्हापूर जॉईंट कमिशनरकडे यापूर्वी तक्रार केली होती. त्यानंतर त्या न्यायालयात दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. दि. 30 जून 2017 ला निकाल देताना पळसुलेदेसाई यांना अपात्र ठरविण्यात आले होते. त्या निकालाविरुद्ध श्रीकृष्ण पळसुलेदेसाई यांनी रत्नागिरीच्या जिल्हा न्यायालयात अपील केले होते. त्या ठिकाणी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने दि.4  जुलै 2018 ला कोल्हापूर जॉईंट कमिशनर यांच्या न्यायालयातील निकाल कायम ठेवताना यापूर्वीचे विश्‍वस्त श्रीकृष्ण पळसुलेदेसाई यांना पदावरुन दूर करण्यात आल्याचा निकाल देताना नवीन विश्‍वस्त मंडळ अधिकारपदी येईपर्यंत रत्नागिरीचे धर्मादाय आयुक्‍त अजित थोरात हे कार्यभार सांभाळतील, असा उल्लेख निकालात केला आहे. 

जिल्हा न्यायालयाच्या निकालाबाबत तक्रारदार वासुदेव करंबेळकर यांनी राजापुरात पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार आता धूतपापेश्‍वर मंदिरात येणार्‍या राज्याच्या कानाकोपर्‍यातील भाविकांनी मंदिरातील सर्व व्यवहार नियुक्‍त करण्यात आलेले रत्नागिरी धर्मदाय आयुक्‍त अजित  थोरात यांच्याकडेच करावेत, असे आवाहन वासुदेव करंबेळकर यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला वासुदेव करंबेळकर यांच्या समवेत प्रकाश आमकर, प्रकाश बांदिवडेकर,प्रकाश नाडणकर व दीपक गुरव आदी उपस्थित होते.