Tue, Jul 16, 2019 01:55होमपेज › Konkan › बॅनरबाजीतून शिवरायांचा अवमान!

बॅनरबाजीतून शिवरायांचा अवमान!

Published On: Mar 04 2018 1:42AM | Last Updated: Mar 03 2018 10:30PMकणकवली : वार्ताहर

कणकवली शिवसेनेच्यावतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येत असून त्यासाठीच्या बॅनरवर शिवसेना नेत्यांचे फोटो वरती तर शिवरायांचा फोटो त्याखाली लावण्यात आला आहे.  शिवरायांपेक्षा शिवसेनेला नेते मंडळी मोठे वाटत आहे. हा महाराष्ट्रातील 32 टक्के मराठा समाजाचा अपमान आहे. शिवरायांच्या अवमान करणार्‍या शिवसेना नेत्यांनी लवकरात लवकर याची जाहीर माफी मागितली पाहिजे. त्याचबरोबर तिथीनुसार शिवजयंती साजरी करत हा वाद सुरु करणार्‍या या मंडळीचा आपण निषेध करत  असल्याचे आ.नितेश राणे यांनी सांगितले. 

कणकवली शहरात शिवसेनेकडून शिवजयंतीनिमित्‍त लावण्यात आलेल्या बॅनरवर आ.नितेश राण ेयांनी आक्षेप घेतला आहे. शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेत आ.राणे यांनी याचा जाहीर निषेध केला. शिवसेनेने लावलेल्या या बॅनरवरून सोशल मिडियावर विरोध झाल्यानंतर नवीन बॅनर लावला असला तरी शिवसेनेने आपल्या मनात शिवरायांना कोणते स्थान आहे, हे दाखून दिले आहे. सिंधुदुर्गात शिवरायांचे मंदिर असून येथील जनतेच्या मनात त्यांच्याशिवाय नितांत आदर आहे. त्यामुळे असे प्रकार आम्ही खपून घेणार नाही. तिथीनुसार शिवजयंती साजरी करून शिवसेना अवमानच करत आहे. कुठल्याही महापुरुषाची जयंती तिथीनुसार होत नाही. शिवसेना नेत्यांनी स्वतःचे वाढदिवस केव्हाही तिथीनुसार केलेले नाहीत. जर शिवजयंती तिथीनुसार करत असाल तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खा.विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, आ.वैभव नाईक यांचे वाढदिवस तिथीनुसार साजरे करा, असे आवाहन आ.नितेश राणे यांनी केले.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कणकवली शहर प्रचार कार्यालय उद्घाटन प्रसंगी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कुणाचेही नाव न घेता आपली भूमिका मांडली होती, असे असताना ते आपल्या विषयी बोलले असे आ.वैभव नाईक सांगत आहेत.आ.नाईक हे नाईक प्रा.लि.चे व्यवस्थापकिय संचालक आहेत. ते नेहमी नफा- तोटयाचे राजकारण करतात. सर्व प्रमुख पदे नाईकांच्याच घरात असली पाहिजेत, अशी भूमिका असल्याने स्वतः आमदार व दोन नगरसेवक आता कणकवलीचा न.प.चा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आपलाच भाऊ असावा, अशी त्यांची भूमिका आहे. त्यांचे कणकवली वासियांवर अचानक प्रेम वाढले आहे. नाईक कुटुंबीयांनी स्वःखर्चातून कणकवलीत उभारलेला एकतरी प्रकल्प दाखवावा, निवडणुकीच्या तोंडावर सीसीटीव्हीसाठी 20 लाखांचा निधी देवून आम्ही नितेश राणेंची किती दखल घेतो, हे त्यांनी दाखून दिले आहे, असे आ.नितेश राणे यांनी सांगितले.

रेस्ट हाऊस कर्मचारी मारहाणी प्रकरणी अधिवेशनात आवाज उठविणार

कणकवली शासकीय विश्रामगृहातील कर्मचारी उल्हास राऊळ यांनी मिटिंग रूम उघडून दिली नाही म्हणून आ.नाईक यांनी  त्यांना मारहाण केली आहे. याचे आपल्याकडे मोबाईल रेकॉडींग असून तो पुरावा म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे दिला जाणार आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास येत्या अधिवेशनात याविषयी आवाज उठवत सरकारला जाब विचारणार असल्याचे आ.नितेश राणे यांनी सांगितले. कणकवली शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत आ.राणे यांनी या मारहाणप्रकरणाकडे लक्ष वेधले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे तो कर्मचारी पालन करत असताना आ.नाईक यांनी त्याच्यावर हात उचलला.

त्यानंतर काही तासात त्या कर्मचार्‍याने पोलिसांत याविषयीचे स्पष्टीकरण दिले असले तरी ते राजकीय दबावाखाली दिलेले आहे. याप्रकारामुळे कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तो कर्मचारी सक्‍तीच्या रजेवर गेलेला आहे. अधिकृतपणे कामकाज असताना मारहाण होत असेल तर हा दहशतवाद सहन करायचा का?असा सवाल उपस्थित करताना त्या कर्मचार्‍या सोबत समीर नलावडे यांनी मोबाईलवरून केलेल्या संभाषणाचे रेकॉडींग  आ.राणे यांनी पत्रकार परिषदेत ऐकविली. शासकीय कर्मचार्‍यांची सुरक्षितता महत्त्वाची असून असे प्रकार सिंधुदुर्गात चालू देणार नाही, असे आ.नितेश राणे यांनी सांगितले.

कणकवलीचे उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेचा उल्‍लेख केला. त्यातून सिंधुदुर्गात चुकीचे राजकारण सुरू झाल्याचे दिसून येते. यातून जिल्हयाची राजकीय पातळी खालावणार असून जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करावा, असे आपले आवाहन असल्याचे आ.राणे यांनी सांगितले. संबंधित महिलेचा लवकरात लवकर जबाब घेवून कोण किती तेलात आहे सर्वांसमोर आणावे, असे आ.राणे यांनी सांगितले.