Mon, Jan 27, 2020 10:44होमपेज › Konkan › कणकवलीत भाजप-स्वाभिमान कार्यकर्त्यांत राडा

कणकवलीत भाजप-स्वाभिमान कार्यकर्त्यांत राडा

Published On: Dec 05 2018 10:02PM | Last Updated: Dec 06 2018 1:35AM
कणकवली : प्रतिनिधी 

कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील राजकीय वादातून बुधवारी सकाळी भाजप नेते संदेश पारकर गटाच्या युवा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नगराध्यक्ष समीर नलावडे गटाच्या दोन कॉलेज युवकांना नगरपंचायत निवडणुकीत स्वाभिमान पक्षाचे काम केल्याचा जाब विचारत बेदम मारहाण केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून नलावडे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत संदेश पारकर यांच्या बाजारपेठेतील घरासमोर उभ्या करून ठेवलेल्या काही मोटारसायकलींची तोडफोड केली. 

स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने संदेश पारकरांच्या घरापासून काही अंतरावर मोठ्या संख्येने जमा झाल्याने कणकवली बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ बंदोबस्तात वाढ केल्याने आणखी धुमश्‍चक्री टळली. याप्रकरणी संदेश पारकर व समीर नलावडे या दोन्ही गटांकडून देण्यात आलेल्या परस्परविरोधी तक्रारींवरून नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह 22 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

ही घटना बुधवारी सकाळी साडेअकरा ते साडेबाराच्या सुमारास घडली. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कणकवलीला असे राजकीय राडे काही नवीन नाहीत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अशा घटनांना काही प्रमाणात आळा बसला होता. विशेष म्हणजे, कणकवली नगरपंचायतीची गेल्या एप्रिल महिन्यात झालेली निवडणूकही कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली होती. त्यामुळे कणकवलीकरांनीही सुटकेचा नि:श्‍वास टाकला होता. परंतु मात्र निवडणुकीनंतच्या काळात काही विषयांवरून भाजप नेते संदेश पारकर आणि कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. तसेच कार्यकर्त्यांमध्येही राजकीय वादाची धुसफूस सुरूच होती. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कणकवली कॉलेजमधील अकरावी सायन्सला शिकत असलेले जीवन दिनेश राणे (17) आणि भावेश कमलाकर निग्रे (17, दोन्ही रा. कणकवली) हे प्रॅक्टीकल संपवून कॉलेज आवारातून निघाले असताना शिवारा मंदिरासमोर मैदानात संदेश पारकर गटाचे आदित्य सापळे, ऋषी वाळके, गौरव सरूडकर, योगेश कोरगावकर, राहूल पेटकर, अक्षय घुरसाळे, तेजस नार्वेकर, शुभम पेडणेकर (सर्व रा. कणकवली बाजारपेठ) हे ग्रुपने उभे होते. त्यांनी जीवन राणे व त्याच्या मित्राला थांबवून तुम्ही  नगरपंचायत निवडणुकीत स्वाभिमान पक्षाचे काम केले, तुम्हाला मारणार असे सांगत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सोशल मिडियावरील काही कमेंटस्चाही राग या घटनेमागे असल्याचे सांगण्यात येते. 

कॉलेज युवकांना मारहाणीनंतर स्वाभिमानचे पदाधिकारी संतप्त

आपल्या कार्यकर्त्यांना संदेश पारकर गटाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचे समजताच नगराध्यक्ष समीर नलावडे, स्वाभिमानचे नगरसेवक आणि पदाधिकारी, कार्यकर्ते संतप्त झाले. नलावडे समर्थकांनी त्यानंतर काही वेळातच एकत्र येत संदेश पारकर यांच्या घरासमोरील उभ्या असलेल्या पाच ते सहा मोटारसायकलची लाठ्याकाठ्यांनी तोडफोड केली. या घटनेवेळी संदेश पारकर यांचे बंधू कन्हैया पारकर व त्यांच्या पत्नी घरात होत्या.  घरासमोर तोडफोडीचा प्रकार समजताच कन्हैया पारकर त्याठिकाणी आले आणि कशासाठी ही तोडफोड केली अशी विचारणा केली. मात्र, नलावडे समर्थक संतप्त झालेले होते. त्यांनी हा प्रकार सुरूच ठेवला. त्यांच्या पाठोपाठ त्याठिकाणी आलेल्या कन्हैया पारकर यांच्या पत्नी सौ. शितल यांना हा तोडफोडीचा प्रकार पाहून त्यांचे ब्लडप्रेशर वाढले आणि त्या  खाली कोसळल्या. या प्रकारानंतर कार्यकर्ते तेथून बाजुला गेले आणि ढालकाठीनजीक नगरपंचायतीकडे जाणार्‍या रस्ता कॉर्नरला एकत्र झाले. यामध्ये नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, नगरसेवक बंडू हर्णे, किशोर राणे, संजय कामतेकर, विराज भोसले, अभी मुसळे, स्वाभिमानचे शहर अध्यक्ष राकेश राणे, युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री आदींसह शेकडो कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झाले होते. दरम्यान संदेश पारकर यांच्या निवासस्थानासमोर मोटारसायकलींची तोडफोड झाल्याचे समजताच कणकवलीचे पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी हे पोलिसफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावाला बाजूला करत परिस्थितीवर नियंत्रण आणले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याची ही दुसरी घटना आहे. आता मात्र आम्ही शांत बसणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिला.

जमावाने पायी चालत पोलिस स्टेशनला दाखल

हर्णेआळीतून डीपी रोडने स्वाभिमानचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने कणकवली पोलिस स्टेशनकडे निघाले. त्यामुळे तणाव आणखीनच वाढला होता. दरम्यान, पोलिसांनी भाजप नेते संदेश पारकर यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्तात वाढ केली होती. नगराध्यक्ष समीर नलावडे, स्वाभिमानचे नगरसेवक यांनी पोलिस स्टेशनला जावून स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना संदेश पारकर समर्थकांकडून कसा त्रास दिला जातो, बाजारपेठेत कशी दहशत निर्माण केली जाते याचा पाढा वाचला. पोलिस निरीक्षक कोळी यांनी पोलिस स्टेशनला येवून मारहाण झालेल्या कॉलेज युवकांची तक्रार घेतली जाईल, तुम्ही कार्यकर्त्यांना शांत करा असे सांगितले.

नगरपंचायतीकडील गाड्या फोडल्याची ठरली अफवा

त्यानंतर काही वेळाने नगरसेवक अभी मुसळे यांनी बाहेर जावून पुन्हा आतमध्ये येत नगराध्यक्ष समीर नलावडे यांना नगरपंचायतीसमोरील आमच्या गाड्या फोडण्यासाठी संदेश पारकर समर्थक जमावाने गेले आहेत असे सांगितले. त्यानंतर समीर नलावडे यांच्यासह स्वाभिमानचे कार्यकर्ते नगरपंचायतीकडे जाण्यासाठी सव्वा एकच्या सुमारास  पोलिस स्टेशनकडून निघाले. मात्र यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी बाजारपेठेतून नगरपंचायतीकडे न जाता झेंडा चौकातून हर्णेआळी मार्गे नगरपंचायतीकडे कार्यकर्त्यांना वळवले, नाहीतर पुन्हा संदेश पारकर यांच्या निवासस्थानासमोर काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती. स्वाभिमानचे कार्यकर्ते नगरपंचायतीकडे रवाना झाल्यानंतर पुन्हा पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी हे अन्य पोलिस अधिकार्‍यांसमवेत न. पं. कडे गेले. मात्र, तेथे पारकर समर्थक कुणीही आलेले नव्हते. त्यानंतर नगराध्यक्ष नलावडे हे कार्यकर्त्यांसमवेत ढालकाठीनजीक थांबले त्यामुळे पुन्हा कार्यकर्त्यांची गर्दी वाढली. या प्रकारामुळे बाजारपेठेतील तणाव वाढला होता. पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी  खबरदारी घेत नगराध्यक्ष नलावडे यांना तेथून मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांना जाण्यास सांगण्याची विनंती केली. यावेळी नलावडे यांनी जर पुन्हा आमच्या कार्यकर्त्यांना मारहाणीचा किंवा गाड्या तोडफोडीचा प्रकार झाला तर आम्ही गप्प बसणार नाही. यावेळी पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी तसा कोणताही प्रकार पुन्हा होणार नाही याची आपण जबाबदारी घेतो. मारहाण करणार्‍यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. त्यानंतर नलावडे समर्थक शांत झाले आणि तेथून ते पुन्हा नगरपंचायतीकडे गेले.

भाजप कार्यकर्तेही पोलिस स्टेशनला दाखल

दरम्यान, दुपारी संदेश पारकर यांचे भाऊ कन्हैया पारकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, महेश सावंत, भाजप तालुकाध्यक्ष संदेश पटेल आदी मंडळी कणकवली पोलिस स्टेशनला दाखल झाली आणि त्यांनी गाड्या तोडफोड प्रकरणी कणकवली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. भाजप नेते संदेश पारकर हे बुधवारी दिवसभर जिल्ह्यात नव्हते. 

आ. वैभव नाईक यांनी दिली संदेश पारकर निवासस्थानाजवळ भेट

संदेश पारकर यांच्या निवासस्थानासमोरील गाड्या स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी फोडल्याचे समजताच दु. 1 च्या सुमारास  आ. वैभव नाईक हे कार्यकर्त्यांसह त्याठिकाणी आले आणि कन्हैया पारकर यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांची दहशत कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला. 

परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल

याप्रकरणी स्वाभिमानचे कार्यकर्ते जीवन राणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संदेश पारकर गटाचे आदित्य सापळे, ऋषी वाळके, गौरव सरूडकर, योगेश कोरगावकर, राहूल पेटकर, अक्षय घुरसाळे, तेजस नार्वेकर, शुभम पेडणेकर (सर्व रा. कणकवली बाजारपेठ) यांच्याविरूध्द मारहाणीचा गुन्हा कणकवली पोलिसांनी दाखल केला आहे. कणकवली कॉलेजमधून प्रॅक्टीकल संपवून आपण आणि मित्र भावेश निग्रे घरी जात असताना हे सर्व संशयित त्या ठिकाणी आले आणि नगरपंचायत निवडणुकीत स्वाभिमानचे काम केल्याच्या रागातून आपणास मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

तर माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून स्वाभिमानचे नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अभि मुसळे, बंडू हर्णे, संजय कामतेकर, किशोर राणे, युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शहर अध्यक्ष राकेश राणे, राजा पाटकर, संदीप नलावडे, निखील आचरेकर, जावेद शेख, पंकज पेडणेकर, विजय इंगळे आणि अल्पवयीन कॉलेज युवक यांच्यासह 100 जणांविरूध्द बेकायदा जमाव करून लाठ्या-काठ्यांनी गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास कणकवलीचे पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी करत आहेत. 

पारकरांची दहशत खपवून घेणार नाही ः समीर नलावडे

नगरपंचायत निवडणुकीत झालेला पराभव संदेश पारकर हे अद्यापपर्यंत पचवू शकलेले नाहीत. त्यांचे कार्यकर्ते बाजारपेठेत रात्रीच्या वेळी गाड्या लावून दहशत निर्माण करत असतात. बाजारपेठेत याच कारणामुळे नगरपंचायत निवडणुकीत मला मतदारांनी जास्त मतदान केले. आमच्या कार्यकर्त्यांना यापूर्वी पारकरांच्या कार्यकर्त्यांनी  मारहाण तसेच धमकी दिली होती. मात्र, कणकवलीची शांतता बिघडू नये यासाठी आम्ही शांत राहिलो होतो. मात्र, आता आम्ही गप्प बसणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल. पारकरांची दहशत खपवून घेतली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्‍त केली. 

नेत्यांना खुश करण्यासाठीच भ्याड हल्ला  ः कन्हैया पारकर

मारहाणीच्या घटनेशी आमचा कोणताही संबंध नसताना विनाकारण दहशत पसरविण्यासाठी आमच्या घरासमोरील गाड्यांची तोडफोड करण्यात आली. नगराध्यक्षासारख्या प्रथम नागरिकाने लाठ्याकाठ्या घेऊन गाड्यांची तोडफोड करणे हे कणकवलीच्या संस्कृतीला अशोभनीय आहे. हा पूर्वनियोजित कट होता. स्वाभिमान संघटना आणि आ. नितेश राणे यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. कुणालातरी खूश करण्यासाठी असे भ्याड हल्ले करणे चुकीचे आहे.   ही दहशत आम्ही खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया संदेश पारकर यांचे बंधू कन्हैया पारकर यांनी व्यक्‍त केली. 

एसआरपी व जलद कृती दलाची तुकडी तैनात

कणकवलीत राजकीय राडा झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी तत्काळ अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक निमित गोयल यांना कणकवलीला पाठवले. दु. 2.30 च्या सुमारास श्री. गोयल हे जलद कृती दलासह कणकवली पोलिस स्टेशनला दाखल झाले. तत्पूर्वी एसआरपीच्या दोन तुकड्या, दंगाकाबू पथकाचे जवान कणकवलीत बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. खबरदारी म्हणून भाजप नेते संदेश पारकर यांच्या घरासमोर, कणकवली नगरपंचायत कार्यालयासमोर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कणकवलीचे प्रभारी पोलिस उपविभागीय अधिकारी शिवाजी मुळीक परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.