होमपेज › Konkan › विजेच्या धक्क्याने आई, मुलाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने आई, मुलाचा मृत्यू

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 02 2018 10:51PMखारेपाटण : वार्ताहर

अंगणातील तारेवर कपडे वाळत घालणारी आई अचानक पडलेली पाहून तिला उठविण्यासाठी मुलगा धावत गेला. मात्र, या प्रयत्नात त्यालाही विजेचा धक्‍का बसल्याने आईसोबत मुलाचाही जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक दुर्घटना गुरुवारी सकाळी 11.15 वा. च्या सुमारास खारेपाटण-कोंडवाडी येथे घडली. सौ. भाग्यश्री बाळकृष्ण शिंदे (वय 60) व संजय बाळकृष्ण शिंदे (35) अशी या दुर्घटनेत मृत झालेल्यांची नावे आहेत. 

शिंदे यांच्या घराला लागूनच पत्र्याचे न्हाणीघर आहे. या पत्र्याच्या शेडला लागून कपडे वाळत घालण्यासाठी तार बांधलेली आहे. तर शेडमध्ये साध्या वायरीने विद्युतजोडणी केलेली आहे. ही वायर कट होऊन तिचा स्पर्श दुर्दैवाने कपडे वाळत घालण्याच्या तारेला झाला होता. यामुळे ती तारही विद्युतभारित बनली होती. सकाळी सौ. भाग्यश्री यांनी न्हाणीघरात कपडे धुतले, त्यानंतर वाळत घालण्यासाठी त्या अंगणात आल्या. कपडे टाकण्यासाठी तारेला स्पर्श करताच विजेच्या धक्क्याने त्या जागीच कोसळल्या. त्यावेळी तार खेचली गेल्याने एका बाजूला बांधलेला दांडा मोडून तारेसह खाली पडला.

यामध्ये विद्युतभारित तार सौ. भाग्यश्री यांच्या अंगावरच पडून राहिली. यावेळी मुलगा संजय हा घरात बसला होता. हे दृश्य पाहून आईला उठविण्यासाठी तो धावत अंगणात आला. त्याने आईला उठविण्याचा प्रयत्न करताच त्यालाही विजेचा धक्‍का बसल्याने तो खाली कोसळला. दरम्यान ,ही घटना त्याच्या वृध्द आजीने पाहिली. हा प्रकार तिच्या लक्षात आल्याने तिने लाकडी दांड्याने तार बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिलाही विजेचा सौम्य धक्‍का बसला. 

यावेळी आजीने केलेली आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. ग्रामस्थांनी तत्काळ या दोघांना खारेपाटण प्रा. आ. केंद्रात दाखल केले. तेथे वैद्यकीय  अधिकारी डॉ. मंडावले यांनी तपासणी करून दोघेही मृत झाल्याचे सांगितले. 

या अनपेक्षित घटनेचे वृत्त गावात पसरताच गाव सुन्‍न झाला. अनेक ग्रामस्थांनी खारेपाटण प्रा. आ. केंद्र तसेच शिंदे यांच्या घराकडे धाव घेतली. शिंदे कुटुंबीय गावात समाजसेवा करणारे कुटुंब म्हणून ओळखले जाते. गावातील सण, उत्सव व धार्मिक न्यायनिवाडे त्यांच्या अंगणात केले जातात. कुटुंबप्रमुख बाळकृष्ण शिंदे हे खारेपाटण सोसायटीत लिपीक म्हणून कार्यरत आहेत. काही कामानिमित्त ते गुरूवारी सकाळी गावाबाहेर गेले होते. तर रिक्षाचालक असलेला मोठा मुलगा सचिन हा रिक्षा घेऊन नेहमीप्रमाणे व्यवसायासाठी गेला होता. या दुर्घटनेत मृत झालेला संजय शिंदे हा अविवाहित असून तो घरची शेती, बागायत सांभाळत होता. याबरोबरच दुग्ध व्यवसाय करून तो कुटुंबाला हातभार लावत होता. दोन दिवसांपूर्वीच शेतीची कामे संपल्याने तो विश्रांतीसाठी घरी थांबला होता. या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे खारेपाटण येथील सहाय्यक अभियंता के. एस. मटेकर, खारेपाटण पोलिस दूरक्षेत्राचे पोहेकाँ पांडुरंग राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला.