Thu, Apr 25, 2019 11:39होमपेज › Konkan › पाडलोस येथे मृत माकडाचे अवशेष

पाडलोस येथे मृत माकडाचे अवशेष

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 14 2018 11:50PM

बुकमार्क करा
मडुरा : वार्ताहर

सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस- केणीवाडा येथील गोकुळदास परब यांच्या काजू बागेत रविवारी सकाळी कुजलेल्या स्थितीतील माकडाचे अवयव आढळून आले. विशेष म्हणजे परब यांच्या घरातील दोन मांजरे अचानक तडफडून मृत पावल्याने माकडतापाची लागण मांजरांना झाली काय, या भीतीने सर्वत्र खळबळ पसरली 
आहे. 

रविवारी सकाळी ग्रामस्थ गोकुळदास परब हे आपल्या घरामागील चाराचा होंडा येथे काजू बागायतीत गेले असता त्यांना कुजकट वास आला. श्री. परब यांनी शोध घेतला असता बागेत अर्धवट कुजलेल्या स्थितीत माकडाचे शेपूट व आजूबाजूला हाडे निदर्शनास आली. याची कल्पना त्यांनी रमण परब व शिवसेना शाखाप्रमुख तथा पाडलोस तंटामुक्‍त समिती अध्यक्ष महेश कुबल यांना दिली. कुबल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वनविभागाशी संपर्क साधला असता, संपर्क  होऊ शकला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

गोकुळदास परब यांचे घर जंगला शेजारी असल्याने आणि घरातील दोन मांजरे अचानक तडफडून मृत पावल्याने केनिवाड्यासह गावात भीतीचे वातावरण  आहे. या मांजरांना माकडतापाची लागण झाल्याची चर्चा  ग्रामस्थांत सुरू आहे.  दरम्यान, पाडलोस गावात आतापर्यंत एकही माकडताप बाधित रुग्ण आढळलेला नाही. मात्र, मृत माकड सापडल्याने पाडलोस गावातील जंगलाची   वनविभागाने पाहणी करावी व वस्तीनजीक होत असलेला माकडांचा उच्छाद थांबवावा, अशी मागणी शिवसेना शाखाप्रमुख महेश कुबल यांनी केली आहे.