Wed, May 22, 2019 17:12होमपेज › Konkan › मुलीने जोपासला वडिलांच्या मूर्तिकलेेचा वारसा!

मुलीने जोपासला वडिलांच्या मूर्तिकलेेचा वारसा!

Published On: Sep 06 2018 1:41AM | Last Updated: Sep 05 2018 8:36PMआचरा : उदय बापर्डेकर

नियती पुढे कोणाचं काही चालत नाही असे म्हटले जाते. मात्र, आलेल्या संकटाने खचून न जाता त्याला धैर्याने तोंड देत काहीजण उभे राहतात आणि समाजासमोर आदर्श निर्माण करतात. आचरा- हिर्लेवाडी येथील खडपे कुटुंबातील  अमृता आणि मानसी या भगिनी त्यापैकीच एक. समज येत्या वयातच वडिलांचे छत्र हरपले असताना दुःख बाजूला ठेवत या भगिणींनी वडिलांची गणपती मूर्तीशाळा मोठ्या हिमतीने सुरू ठेवली.  आज त्यांचे मूर्तिकाम गणेशभक्‍तांच्या पसंतीस उतरले आहे. त्यांच्या या जिगरबाज वृत्तीने  त्या सर्वत्र कौतुकाचा विषय बनल्या आहेत.

आचरा- हिर्लेवाडी येथे अत्यंत कष्टप्रद जीवन जगणारे संजय खडपे आणि त्यांचे कुटुंब. घरात पत्नी आणि दोन मुलीं. मोलमजुरी आणि हंगामात मूर्ती शाळा हे त्यांच्या उपजिविकेचे साधन. पण गेल्या एप्रिलमध्ये ऐन पन्‍नाशीतच संजय खडपे यांचे आकस्मिक निधन झाले आणि कुटुंबाचा आधार हरपला. दोन तरुण मुलींना घेऊन घरगाडा  कसा  सांभाळायचा? या विचारानेच श्रीमती  संजना खडपे यांचे अवसान गळून पडले. पण  या  संकटाने खचून न जाता नुकतीच बारावी झालेल्या  अमृताने वडीलांचे अंत्यसंस्कार स्वतः करत कुटुंबाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. खचलेल्या आईला आणि बारावीत शिकणार्‍या आपल्या मागच्या बहिणीला आधार देत वडिलांचा वारसा असलेली गणपती शाळा सुरूच ठेवण्याचा तिने निर्धार केला.                                                                                                          
केवळ निर्धार करूनच गप्प न बसता वडिलांचे कार्य आटोपताच अमृताने तसे प्रयत्न सुरू केले. अमृताला घरातील म्हशीच्या देखभालीसह दुधाचे रतीबही घालावे लागत होते. पण वडिलांची ओळख असलेला मूर्ती कलेचा वारसा चालविण्याचा तिचा दृढ निश्‍चय होता. वडिलांसोबत वावरताना गणपती मूर्ती घडविण्याच्या जुजबी ज्ञानावर तिने मूर्ती शाळा सुरू करण्याचं ठरवलं. या साठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी तीने वडिलांच्या वहीतून माहिती घेतलीव माती, रंग साहित्याची ऑर्डर नोंदवली. पण आपण केलेल्या मूर्ती लोक घेतील का? हा प्रश्‍न तिला सतावत होता. गावातले ज्येष्ठ नागरिक बबन वझे यांनी तिला धीर देत तिचा उत्साह वाढविला.  तू जशी मूर्ती साकारशील तशी आम्ही स्वीकारू, असे काही जुन्या ग्राहकांनी सांगितल्याने तिचा उत्साह व आत्मविश्‍वास दुणावला.  एक मुलगी  वडिलांच्या मूर्ती शाळेचा वारसा चालवत आहे, ही बातमी समजल्यावर अमृताला  प्रोत्साहन देण्यासाठी अन्य काही जणांनी त्यांना गणेशमूर्तीची  ऑर्डर देऊन तिचा हूरूप वाढवला. प्रथम तीन-चार मूर्ती बनवायच्या असा विचार केलेल्या अमृताला चक्‍क काही दिवसांतच तीस- पस्तीस गणेश मूर्तींची ऑर्डर मिळाली. 

अशाप्रकारे हुरूप वाढलेल्या अमृताने मे महिन्याच्या संकष्टीला गणपती मूर्ती घडविण्याचा शुभारंभ केला. तिची जिद्द व धडपड पाहून वाडीतील काही महिला तिच्या मदतीला पुढे सरसावल्या. कीर्ती पेडणेकर, श्रीमती मेस्त्री वहीनी याबरोबरच नारायण होडेकर  तीच्या मदतीला धावून आले. दहावीचे वर्ष असून ही मामेबहीण तसेच शाळा सांभाळून धाकटी बहीण मानसीसुद्धा अमृताला मदत करत आहे. अमृताचे मूर्ती कलेतील कसब पाहून लोक अचंबित होत आहे. संकट सर्वांवरच येतात. पण मुलगी आहे म्हणून हातपाय गाळून न बसता केवळ जिद्दीच्या जोरावर अवघ्या एकोणिसाव्या वर्षी  घराची जबाबदारी पेलत अमृताने जोपासलेला वडिलांच्या मूर्ती कलेचा वारसा सर्वच महिलांसाठी आदर्शवत आहे.