Mon, Aug 19, 2019 07:35होमपेज › Konkan › देवरूखात उसळला हिंदू जनसागर

देवरूखात उसळला हिंदू जनसागर

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 09 2018 10:49PM

बुकमार्क करा
देवरूख : प्रतिनिधी

नगरपंचायतीच्या पटांगणावर रविवारी पार पडलेल्या देवरूख तालुक्याच्या हिंदू चेतना संगम या कार्यक्रमाला स्वयंसेवकांसह नागरिकांचा एकप्रकारे जनसागरच उसळला होता. प्रमुख पाहुणे व वक्ते यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे स्वयंसेवकांमध्ये एक प्रकारची चेतना निर्माण झाली आहे. समाजातील अनेक सज्जन व्यक्तींना एका सूत्रात जोडणे आणि हिंदूभाव जागृतीच्या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांतातर्फे ‘हिंदू चेतना संगम’ या कार्यक्रमाचे रविवारी कोकण प्रांतात आयोजन करण्यात आले होते. देवरूख तालुक्याचा कार्यक्रम शहरातील नगरपंचायतीच्या पटांगणावर सायंकाळी 4 ते 6  या वेळेत उत्साहात पार पडला. 

कार्यक्रमाला प्रमुख वक्ते प्रांत कार्यकारिणी सदस्य भूषण दामले तसेच प्रमुख अतिथी म्हणून एम. डी. आयुर्वेद डॉ. विनय ढवळ हे उपस्थित होते. मान्यवरांचे आगमन होताच स्वयंसेवकांनी प्रणाम देऊन स्वागत केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारां झाला. यानंतर सांघिक पद्य झाले. तालुका कार्यवाह संदीप पानगले यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. तसेच पानगले यांनी प्रास्ताविक करताना देशभरात संघाच्या 57 हजार 185 शाखा आहेत. 14 हजार 896 साप्ताहिक मिलन, 7 हजार 500 संघ मंडळी तर 1 लाख 66 हजार सेवाकार्य चालतात.

हिंदू चेतना संगम कार्यक्रमासाठी गेली दोन वर्षांपासून तयारी सुरू असल्याचे नमूद केले. नीटनेटक्या आयोजनामुळे तालुक्याचा कार्यक्रम दिमाखात पार पडत आहे, याबद्दल समाधान वाटत असल्याचे 
नमूद केले. याहीपुढे जाऊन मंडळ स्तरावर अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे पानगले यांनी नमूद केले.  यानंतर डॉ. ढवळ आयुर्वेद व भारतीय संस्कृतीचे महत्त्व ओघवत्या शैलीत मांडले. परशुरामाच्या पदस्पदर्शाने पावन झालेली कोकण भूमी आहे. तरूण पिढी सध्या पाश्‍चिमात्य संस्कृतीचे चटकन अवलोकन करत आहे. भारतीय संस्कृतीचा जणू विसर पडत चालला आहे. आयुर्वेदाच्या आधाराने भारतीय संस्कृतीत प्रत्येक ऋतुनुसार सण साजरे केले जातात. हे मानवाला पोषक आहेत. तरूणांनी भारतीय संस्कृती आत्मसात करणे गरजेचे आहे. संस्कृती जपण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतो, असे नमूद केले.

यानंतर अमृतवचन, सुभाषित, वैयक्तिक पद्य सादर झाले. यानंतर प्रमुख वक्ते यांनी दामले यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. संघ केवळ हिंदू संघटन करतो एवढेच कार्य मर्यादित नसून प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपण हिंदू असल्याची जाणीव करून देण्यात येत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात हिंदू असल्याची चेतना निर्माण करणे या ‘हिंदू चेतना संगम’ कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे. चांगले विचार संघ देतो. चांगल्या बाबींचा प्रचार करण्याची ताकद केवळ संघामध्ये सामावलेली असल्याचे दामले यांनी आवर्जून सांगितले. हिंदूंचे नववर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होते. मात्र, आजचे तरूणवर्ग हे 31 डिसेंबर रोजी पार्टी करून नववर्ष साजरे करतात. ही वृत्ती बदलणे गरजेचे आहे.

आज काळात कुटुंब भावना संकुचित झाली आहे. कुटुंब प्रबोधनाचे काम संघ करतो. प्रत्येक स्वयंसेवक हा कुटुंबाप्रमाणे समाजात वावरत असतो. तरूणांमध्ये असलेल्या संकुचित स्वााव बदलण्याचे आवाहन स्वयंसेवकांसमोर आहे. स्वयंसेवकाने  स्वयंप्रेरणेने काम करण्याची खर्‍या अर्थाने गरज आहे. भारत मातेचे रक्षण करणे हे प्रत्येक स्वयंसेवकाचे कर्तव्य असल्याचे दामले यांनी अखेर स्पष्ट केले.  
कार्यक्रमाला देवरूखसह सायले, ताम्हाणे, तुळसणी, आंगवली, कोंडगाव, भडकंबा, देवळे मंडळातील 193 आत्मीय स्वयंसेवक बंधू गणवेशात उपस्थित होते. अनेक नागरिक या सोहळ्याचे क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी उपस्थित होते. प्रार्थनेनंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. यानंतर भारतमाता प्रतिमा पूजन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.