होमपेज › Konkan › लमाणी समाजाच्या झोपडीत अंधारच..!

लमाणी समाजाच्या झोपडीत अंधारच..!

Published On: Feb 10 2018 11:17PM | Last Updated: Feb 10 2018 10:58PMसावर्डे : वार्ताहर

धरणीमातेचे अंथरूण व आकाशाचे पांघरून घेत ऊन, वारा, पाऊस या आव्हानाला सामोरे जात  व उघड्या रानमाळावर  संसार मांडून मिळेल त्या जागेवर झोपडी उभारून लमाणी समाज (बंजारा) राहत आहे. त्यांच्या या झोपडीत विकासाचा उजेड कधी पोहोचणार? हा प्रश्‍न आजही अनुत्तरितच आहे.

पावसाळा संपला की, लमाणी समाज आपल्या कुटुंबासहीत कर्नाटकच्या विविध भागांतून गावोगावी मजल-दरमजल करीत कोकणात दाखल होतो.  मैलोन्मैल चालत रोज नवीन गाव शोधत मिळेल तिथे पाल मारून उघड्यावर संसार मांडून जीवन जगत आहे. भटकंती ही त्यांच्या जणू पाचवीला पूजलेली आहे. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली कष्टाची कामे येईल, त्या परिस्थितीशी संघर्ष करत हा समाज आजवर चरितार्थ चालवित आहे.

ठिकठिकाणी  मिळणारी रोजंदारी व त्यामुळे प्रत्येकवेळा नवीन गावात राहाणे यामुळे या समाजातील मुलांचा शिक्षणाचा प्रश्‍न नेहमीच ऐरणीवर असतो. त्यामुळे जिथे शिक्षणच नाही तिथे ज्ञानाचा आणि विकासाचा प्रकाश कसा पोहोचेना?  शिक्षणाअभावी आजवर हा समाज मोलमजुरीच करीत आहे. रस्त्यावरची खडी फोडणे, डांबरीकरण करणे,  रेल्वे रूळ बांधणे, विहीर व चर खोदाई अशी अंगमेहनतीची कामे हा समाज करीत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल तेथे झोपडी बांधून हा समाज राहतो. गावाकडे पाऊसपाणी ठीक नसल्याने शेती पिकत नाही. मूलंबाळं जगविण्यासाठी, रोजीरोटीसाठी भटकंती केल्याशिवाय दुसरा आधार यांना नाही. सरकारच्या योजना खूप आहेत. पण या समाजापर्यंत त्या पोहोचविण्यात लोकप्रतिनिधींची उदासीनता आड येत आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे आम्ही अशाच पद्धतीचे जीवन जगत असल्याची खंत सखुबाई पवार यांनी व्यक्‍त केली.