Sat, Feb 23, 2019 14:47होमपेज › Konkan › सूर्यकांत दळवींचे उपोषण स्थगित

सूर्यकांत दळवींचे उपोषण स्थगित

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दापोली : प्रतिनिधी

दापोली तालुक्यातील विविध जेटींच्या कामासंदर्भात माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी सुरु केलेल्या लाक्षणिक उपोषणाला समाजाच्या विविध स्तरातून पाठिंबा मिळाला असून शासकीय अधिकार्‍यांनी लेखी पत्र देत या जेटींची कामे तातडीने मार्गी लावण्याची हमी दिली आहे. त्यामुळे हे उपोषण आपण तूर्तास स्थगित करीत असल्याचे दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी जाहीर केले. जेटींच्या कामासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले.

हर्णे, दाभोळ, बुरोंडी बंदरावरील जेटीसंदर्भात व मच्छीमारांवरील अन्यायाच्या विरोधात माजी आ. सूर्यकांत दळवी यांच्या उपोषणाला मच्छीमार पदाधिकारी आणि बांधव यांच्या उपस्थितीत सकाळपासून सुरुवात झाली होती. यावेळी   सहयक मत्स्य आयुक्त श्री. साळुंखे यांनी उपोषणकर्ते सूर्यकांत दळवी यांना ‘सागरमाला’ योजना 2017-18 मधून हर्णै बंदर विकसित करण्यासाठी 285.33 कोटी शासनाने मंजूर केले असून दाभोळ व बुरोंडी जेटीच्या विकासासाठी प्रत्येकी 25 कोटी तर उटंबर व आडे येथील जेटीच्या बांधकामासाठी 12 कोटी इतकी रक्कम प्रस्तावित करण्यात आल्याचे सांगितले. 
यावेळी सूर्यकांत दळवी यांनी गेली 25 वर्षे  आपण आमदार असताना या जेटी मंजूर व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले.

2005 मध्ये या जेटी मंजूर करण्यात आल्या. मात्र, त्यांच्यासाठी भरीव रकमेची तरतूद करण्यात आली नाही. मुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्याकडून मला  अपेक्षा असून ते याबाबतीत नक्कीच सकारात्मक निर्णय घेतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. दापोलीच्या तहसीलदार कविता जाधव यांनी प्रशासकीय स्तरावर संपूर्णपणे मदत करण्याची तयारी दर्शविल्याने सर्व पदाधिकारी व अधिकारी यांच्या विनंतीला मान देऊन लेखी आश्‍वासनानंतर लाक्षणिक उपोषण स्थगित करण्यात आले.

यावेळी त्यांच्यासोबत माजी सभापती किशोर देसाई, शिवसेनेचे शांताराम पवार, ऋषिकेश गुजर, हर्णै पाज फिशिंग सोसायटीचे चेअरमन विष्णू पावसे, विभागप्रमुख नारायण खळे, सोमनाथ पावसे, किरण दोरकुळकर, दत्ताराम पेडेकर, महेश पाटील, केशव वाघे, दिनेश कालेकर, अशोक दोरकुळकर, भास्कर दोरकुळकर, चंदू पाटील, देवचंद पावसे, गजानन तबीब, पांडू पावसे, प्रकाश रहाटवळ, गोपीचंद चोगले, बाळकृष्ण पावसे, श्री. नरेंद्र करमरकर, सुलतान आराई, वाजिद खान, कासम महालदार, भरत निर्मळ आणि मच्छीमार बांधव होते. 

या उपोषणाला भाजप जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे, भाऊ इदाते, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस स्मिता जावकर, भाजपचे नेते इकबाल परकार, ‘आरपीआय’चे जिल्हा सरचिटणीस प्रीतम रुके, ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी पाठिंबा दर्शविला.