Sun, Dec 16, 2018 22:46होमपेज › Konkan › दापोलीत बेकायदेशीर मासेमारीचा धुमाकूळ

दापोलीत बेकायदेशीर मासेमारीचा धुमाकूळ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी 

मासेमारी बंदीकाळात राज्य अधिकार क्षेत्रातील दापोली समुद्रात परजिल्ह्यांतील बोटी येऊन मासेमारी करत आहेत. बंदी असूनही एलईडी प्रकाशातील मासेमारी होत आहे, अशा तक्रारी करत दोन महिन्यांपूर्वी मच्छीमारांनी रत्नागिरीत येऊन सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्‍तांना जाब विचारला होता. त्यावेळी सहायक आयुक्‍त आनंदराव साळुंखे यांनी दापोली परवाना अधिकार्‍यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या. परंतु, प्रत्यक्षात काही होत नसल्याने स्थानिक मच्छीमार संतप्त झाले असून पुन्हा आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

जानेवारीच्या 1 तारखेपासून पर्ससीन, मिनी पर्ससीन मासेमारीचा बंदी काळ सुरू झाला. व्हीटीएस यंत्रणा असलेल्या बोटींना 12 नॉटिकल मैल बाहेर केंद्राच्या अधिकारातील समुद्र क्षेत्रात मासेमारी करण्यास मुभा आहे. परंतु, 35 कि.मी.च्या दापोली समुद्रात रायगडच्या मच्छीमार बोटी येतात. ज्या क्षेत्राचा परवाना असतो त्या बंदरातच संबंधित बोटींनी मासेमारी करणे बंधनकारक असते. बंदी असलेली एलईडी मासेमारीदेखील सुरू आहे. अशा एक ना अनेक तक्रारी घेऊन स्थानिक पारंपरिक मच्छीमार दोन महिन्यांपूर्वी सहायक मत्स्य व्यवसाय कार्यालयावर धडकले होते. 

आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या आंदोलकांनी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्‍तांना घेराओ घालून धुमाकूळ घालणार्‍या बेकायदेशीर मासेमारीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावेळी सहायक आयुक्‍त साळुंखे यांनी दापोली परवाना अधिकारी राजकुमार महाडिक यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या.दोन महिन्यांनंतरही तशीच बेकायदेशीर मासेमारी सुरू असताना कारवाई मात्र शून्य आहे. त्यामुळे दापोलीतील पारंपरिक मच्छीमार पुन्हा आंदोलन करण्याचा विचार करू लागले आहेत. तर दुसरीकडे परवाना अधिकारी महाडिक दापोली समुद्रात गस्तीसाठी का जात नाहीत? वरिष्ठांच्या सूचनांचे पालन का करत नाहीत? तरीही सहायक आयुक्‍त शांत का? असे प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

Tags :  Konkan, Konkan News, Dapoli sea, illegal, fishermen,  fishing


  •