Thu, Apr 25, 2019 13:26होमपेज › Konkan › मेल्यावर सेवेत कायम करणार का

मेल्यावर सेवेत कायम करणार का

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दापोली : प्रतिनिधी

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे 1985 पासून मजूर म्हणून काम करत असलेल्या दापोली तालुक्यातील 300 हून अधिक मजुरांना कोकण कृषी विद्यापीठाने कायम केले नसून, त्यांना रोजंदारी देखील अल्पच मिळत आहे. याबाबत या मजुरांनी शासनासह कोकण कृषी विद्यापीठाचे उंबरठे झिजवले. मात्र, अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठामध्ये आम्ही मेल्यावर आम्हाला कायम करणार का? असा सवाल येथील वयोवृद्ध झालेल्या महिलांनी कोकण कृषी विद्यापीठाला केला आहे.

कोकण कृषी विद्यापीठात मजूर म्हणून काम करणार्‍या  महिला आणि पुरुष कामगार यांची बैठक शनिवारी पांगारवाडी येथे झाली. यावेळी या महिलांनी आपली व्यथा मांडली. याबाबत एक दिवशी सोमवारी (दि. 27) काळी फित लावून आंदोलन करण्यात येणार असून, याबाबत दापोली कृषी महोत्सवामध्ये येणार्‍या कृषी मंत्र्यांना निवेदनही देण्यात येणार आहे. या निवेदनामध्ये गेली अनेक वर्षे काम करणार्‍या मजुरांना कायम अस्थापनेवर घ्यावे, नाम निर्देशनाने नेमणूक करताना स्थानिक मजुरांना 80 टक्के लोकांना नोकरीत सामावून घेण्यात यावे व 20 टक्के बाहेरील लोकांना सामावून घेण्यात यावे, सेवाज्येष्ठतेनुसार रिक्त जागा व कायम स्वरुपी नोकरी मिळण्याबाबत प्रयत्न करणे, जे मजूर विद्यापीठाच्या सेवेतून सोडून गेले आहेत त्यांचा पुन्हा विचार करु नये, अशा प्रमुख मागण्या या निवदेनामध्ये आहेत.

कोकण कृषी विद्यापीठ श्रमिक कामगार संघटना या नावाने या मजुरांनी ही संघटना रजिस्टर केली आहे. संघटनेचे अध्यक्ष संतोष भुवड, उपाध्यक्ष दत्तात्रय भुवड, सचिव शेखर कोकमकर, खजिनदार नीलेश बैकर असे या संघटनेचे पदाधिकारी आहेत. या संघटनेच्यावतीने कोकण कृषी विद्यापीठ, मुख्यमंत्री, कृषी मंत्री, जिल्हा अधिकारी, उपविभागीय अधिकारी दापोली, दापोली तहसीलदार, दापोली पोलिस निरीक्षक यांना काम बंद आंदोलनाचे पत्र देण्यात आले आहे.

या कामबंद आंदोलनामध्ये बर्‍याच महिला या निवृत्तीला आल्या असून, स्थानिक असूनदेखील विद्यापीठाने आणि प्रशासनाने त्यांची दखलच घेतलेली नाही. विद्यापीठातील कर्मचारी भरतीमध्ये स्थानिकांना पहिले प्राधान्य असताना विद्यापीठ प्रशासन आणि नेमणूक करणारे दुजाभाव करीत आहेत. त्यामुळे स्थानिकांवर अन्याय होत असल्याचे यावेळी उपस्थित महिलांनी सांगितले. शासनाने अनेक भरती प्रक्रिया राबविल्या मात्र, त्यामध्ये दापोली कोकण कृषी विद्यापीठातील 300 हून अधिक मजूरांना अद्याप स्थान मिळालेले नाही.