Fri, Mar 22, 2019 02:10
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › कृषी विद्यापीठाकडून शिष्टाचार भंग

कृषी विद्यापीठाकडून शिष्टाचार भंग

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दापोली : प्रतिनिधी

दापोली येथे 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत होणार्‍या आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत राजशिमंत्र्यांच्या नावाचा क्रम चुकल्याने राजशिष्टाचाराचा भंग झाल्याने या निमंत्रण पत्रिका बदलण्याची नामुष्की स्पर्धेचे यजमान असलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ प्रशासनावर आली आहे. दापोली येथे 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव होत आहे. या महोत्सवासाठी राज्यातील 20 विद्यापीठांमधील विद्यार्थी खेळाडू सहभागी होणार आहेत.  या वर्षी या महोत्सवाचे यजमानपद येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडे आहे.

या महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रम तसेच समारोप कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका दापोली शहरातील तसेच सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांना पाठविण्यात आली होती. ही पत्रिका भाजपाचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनाही मिळाल्यावर त्यांनी ती वाचली असता त्यांना राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे नाव या निमंत्रण पत्रिकेत शेवटी टाकल्याचे आढळून आले. या पत्रिकेतील क्रमवारीत या महोत्सवाचे उद्घाटक म्हणून राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांचे नावे प्रथम त्यानंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम, पाठोपाठ रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत, कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य यांचे नाव तर शेवटी राज्याचे ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री असलेल्या कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे नाव या पत्रिकेत टाकण्यात आले  आहे.

हा प्रकार लक्षात आल्यावर केदार साठे यांनी तत्काळ कृषिमंत्री फुंडकर यांच्या मंत्रालयातील कार्यालयाशी संपर्क साधून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने निमंत्रण पत्रिकेत मंत्र्यांची नावे छापताना शिष्टाचार (प्रोटोकॉल) पाळला नसल्याची तक्रार केली. त्या नंतर मंत्री कार्यालयातून कृषी विद्यापीठाला प्रोटोकॉल संदर्भात सूचना देण्यात आल्यावर या स्पर्धेच्या यजमान कोकण कृषी विद्यापीठाच्या स्पर्धा आयोजन समितीला निमंत्रण पत्रिका बदलावी लागली असून या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे नाव प्रथम टाकण्यात आले आहे.

या संदर्भात भाजपाचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे, तालुकाध्यक्ष श्रीराम (भाऊ) इदाते यांनी कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांची भेट घेऊन विद्यापीठाने निमंत्रण पत्रिकेत कृषी मंत्र्यांचे नाव शेवट टाकून औचित्यभंग केला असल्याचे सांगितल्यावर कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य झालेली चूक मान्य करून निमंत्रण पत्रिकेत सुधारणा केली असल्याचे सांगितले.  

दरम्यान, केदार साठे यांनी या निमंत्रण पत्रिकेत कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांचे नाव ते या खात्याचे मंत्री तसेच कृषी विद्यापीठाशी संबंधित असलेल्या खात्याचे राज्यमंत्री असल्याने त्यांचे या निमंत्रण पत्रिकेतील नाव हे दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या अगोदर असणे गरजेचे असल्याचे सांगितले मात्र विद्यापीठाने आपला हेका कायम ठेवत कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांच्या नावाच्या क्रमवारीत बदल न केल्याने ही माहिती केदार साठे यांनी विद्यापीठाने  प्रोटोकॉलचा भंग केल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.दरम्यान, विद्यापीठाने अगोदरच  निमंत्रण पत्रिका वितरित केलेल्या असल्याने ज्यांना या जुन्या निमंत्रण पत्रिका दिल्या आहेत त्या सर्वांना आता नवीन निमंत्रण पत्रिकाही देण्याची नामुष्की विद्यापीठावर आली आहे.